अमरावती Navneet Rana On Parliament attack : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत सहा तरुणांनी गोंधळ घातला. त्यामुळं पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. संसदेची कडेकोट सुरक्षा व्यवस्था तोडून दोन जणांनी सभागृहात प्रवेश करत गोंधळ घातला. त्यावेळी त्यांनी हुकूमशाही चालणार नसल्याची घोषणा देखील दिली. याबाबत चार तरुणांना ताब्यात घेण्यात आलं असून दोघांचा शोध सुरू आहे. त्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोंधळ घालणारे महुआ मोईत्रा यांची माणसं : संसदेत दोघांनी उड्या मारून गोंधळ घातला. तो संपूर्ण प्रकार देशासाठी लाजिरवाणा आहे. लोकसभेतून दोन दिवसांपूर्वीच हकालपट्टी करण्यात आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांची 'ती' माणसं असल्याचा खळबळजनक आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, संसदेत उडी मारलेल्या दोघांसह त्यांच्यामागे असलेल्या दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. संसदेचा आपल्या देशाला अभिमान आहे. त्या संसदेत बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदाराशी संबंधित लोकांनी गोंधळ घातला. लोकशाहीच्या मंदिरात कोणी गडबड करत असेल, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केलीय.
मोबाईल डाटा तपासा : भारताचं संसद भवन पाहण्यासाठी आपल्या देशातून तसंच परदेशातूनही अनेक लोक येतात. लोकशाहीच्या या मंदिरात धुमाकूळ घालणाऱ्या व्यक्तींचा मोबाईल डेटा तपासण्यात यावा. यासोबतच त्यांच्यामागे असलेल्यांचा मोबाईल डेटाही तपासण्यात यावा. त्यांचं फेसबुक खात देखील तपासलं पाहिजे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. आज घडलेला प्रकार देशावर डाग असून अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय.
हेही वाचा -