अमरावती - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी राजपेठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्तिप्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी नवनीत राणी बैलगाडीत उभ्या राहून आल्या होत्या.
यावेळी मेळघाटातील आदिवासींचे नृत्य विशेष आकर्षण होते. राजपेठ, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर, जिल्ह्याच्या विकासासाठी माझी खासदार म्हणून प्रयत्न करण्याची तळमळ राहील, असे नवनीत राणा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी मंत्री वसुधा देशमुख, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई, माजी आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर बोरकर, माजी महापौर वंदना कंगले उपस्थित होते.