अमरावती Nana Patole On Modi : महाराष्ट्रात भाजपाला उतरती कळा लागली आहे. महाराष्ट्रात एकूण 40 ठिकाणी भाजपाला धोका असल्याचा अहवाल त्यांनीच केलेल्या सर्वेक्षणात समोर आला आहे. (Nana Patole) एकूणच महाराष्ट्रात भाजपाची परिस्थिती बिकट असून राज्यात भाजपाचे नेते निष्फळ ठरले आहेत. (Patole Vidarbha tour) यामुळे पक्षाचे प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात चकरा वाढल्या आहेत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत म्हटलं आहे. अमरावतीत पश्चिम विदर्भातील काँग्रेसचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते आले असून या निमित्तानं नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नेते इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अतिशय बळकट झाली असल्याचं भाजपाला देखील मान्य आहे. राज्यातील एकूण परिस्थिती पाहता काँग्रेस मधील बड्या नेत्याला आपल्या पक्षात इम्पोर्ट करून काही भागवता येईल का? असा प्रयत्न भाजपाकडून होतो आहे. याचाच एक भाग म्हणून आमचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी देखील भाजपाने सलगी साधत आपल्या पक्षात येण्यासाठी प्रयत्न केलेत असे देखील नाना पटोले म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांबाबत निर्णय नाही : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशा चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत महाआघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे या सर्वांना घेऊनच विचार केला जाईल असं देखील नाना पटोले म्हणाले.
अमरावतीत होत आहे आढावा बैठक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत आज पश्चिम विदर्भातील काँग्रेस पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण तसंच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा: