अमरावती - सध्या पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे पीक तहानलेले आहेत. पाण्याअभावी शेतातील जमिन भेगाळली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. विहरीतील पाण्याने पाणी देण्याचा विचार आम्ही शेतकऱ्यांचा होता. परंतु आम्ही वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आमच्या शेतातील वीज पुरवठाच खंडित करून टाकला. त्यामुळे आता हातातोंडाशी येणारे हिरवेगार पिके करपून जाणार असल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
'महावीतरणचे साहेब म्हणतात आधी पैसे भरा'
एकीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री महावितरणच्या अधिकाऱ्यांना म्हणतात शेतकऱ्यांसोबत इंग्रजांसारखे वागू नका. त्यांना चांगली वागणून द्या. मात्र, महावीतरणचे साहेब म्हणतात आधी पैसे भरा, मगच वीज चालू करतो. हे वाक्य आहे अमरावती पासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे. शेतातील थकीत वीज बिल भरले नाही म्हणून, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रोहित्रातील फेज काढून रोहित्र मधून वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. वीज नसल्याने आता शेतातील पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.
'वीज पुरवठा मागील अनेक दिवसांपासून बंद'
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर गावानजीक असलेल्या शेतशिवारातील चिमणापूर रोहित्रा वरील वीज पुरवठा मागील अनेक दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बंद करून ठेवल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या पावसाने दडी मारली आहे .त्यामुळे पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे शेतकरी सिंचनाच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, महावितरणच्या आडमुठ्या धोरणामूळे आता पाणी देण्याचा पर्यायही शेतकऱ्यांसमोर उरला नाही. त्यामुळे शेकडो एकरवरील पिके धोक्यात आले आहेत.
दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतात विज गेली
पूर्णानगरच्या चीमनापुर शेतशिवारातील रोहित्रा वरून जवळपास दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतात विज गेली आहे . हे शेतकरी वर्षातून दोन-तीन वेळाच आपल्या शेतात विजेचा वापर करतात. असे असतानाही महावितरणने या शेतकऱ्यांना भरमसाठ बिले दिली आहे. त्यात मागील दोन-तीन वर्षांपासून पिके हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकरी बिल भरू शकले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. ही परिस्थिती एकट्या पूर्णानगर परिसरातील नाही. तर, जिल्ह्यातील अनेक भागात महावितरणकडून दमदाटी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना सुनावले होते
अलीकडेच पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महावितरणला धारेवर धरून, शेतकर्यांना त्रास न देण्याचे महावितरणला सांगितले होते. मात्र, महावितरणकडून शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शेतामध्ये असलेल्या रोहित्रही जीवघेने ठरत आहे. यासंदर्भात महावितरणचे अधिकारी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना फोन लावला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.