अमरावती - चांदूर रेल्वे शहरातील बीएसएनएल कार्यालयाचा विद्युत पुरवठा वीज बिल थकल्याने खंडीत करण्यात आला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बीएसएनएलचे सर्व सीम, मोबाईल इंटरनेट सेवा आणि ब्रॉडबँड इंटरनेट बंद झाली आहे. परिणामी बीएसएनएलच्या या भोंगळ कारभारामुळे ग्राहक वैतागले आहे.
चांदूर रेल्वे शहरात भारत संचार निगम लिमीटेडची दुमजली इमारत असून या ठिकाणावरून बीएसएनएलचा शहराचा सर्व कारभार चालतो. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यालयाचे विद्युत देयके भरण्यात आलेली नव्हती. हा आकडा ३ लाखांच्या घरात पोहोचल्यानंतर विद्युत वितरण कंपनीने बीएसएनएल कार्यालयातील विद्युत पुरवठा शुक्रवारी खंडित केल्याची माहिती आहे.
वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने सर्व मोबाईल सीम शुक्रवारी बंद पडले. एवढेच नाही, तर इंटरनेट ब्रॉडबँड सेवासुध्दा बंद पडली. याआधी पाच दिवसांपूर्वीच काही तांत्रिक कामामुळे सर्व बीएसएनएलचे सीम बंद पडले होते. यानंतर आता पुन्हा दोन दिवसांपासून सीम व इंटरनेट बंद असल्यामुळे ग्राहक वैतागले आहेत. एकाच महिन्यात ५-६ दिवस सिम, इंटरनेट बंद राहत असेल तर त्यासाठी मारलेल्या रिचार्जची वैधतासुध्दा कंपनीतर्फे वाढवून दिली गेली पाहिजे, असे मत एका ग्राहकांने व्यक्त केले.
जिओमुळे बीएसएनएलसमोर आपले अस्तित्व टिकविण्याचे आव्हान असताना अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅनमुळे बीएसएनएल ग्राहक आपल्याकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र चांदूर रेल्वे तालुक्यातील, अशा गलथान कारभारामुळे आता या कंपनीचे ग्राहक कमी होताना दिसत आहे.