अमरावती : राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागले, तरी अपेक्षेप्रमाणं निकाल लागलेला नाही. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन, पुढील निवडणुकीसाठी योग्य तयारी करतील. आम्ही अजिबात निराश नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी म्हटलंय. ते आज अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दाखवायचं काय त्यामुळं राम मंदिराचा जल्लोष : केंद्र सरकारनं देशाच्या विकासासंदर्भात ठोस असं कुठलंच काम केलं नाही. त्यामुळं भाजपा राम मंदिर आपणच तयार केल्याचा जल्लोष करत आहे. राम मंदिर कार्यक्रमाचं मला निमंत्रण आहे की नाही, हा महत्त्वाचा विषय नाही. खरंतर कुठलाही धार्मिक सोहळा असो, किंवा धार्मिक ठिकाणाला भेट देणं असो, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, असं शरद पवार म्हणाले.
146 खासदारांना निलंबित करणं दुर्दैवी : संसदेत घुसखोरी करणं, अतिशय गंभीर बाब आहे. सभागृह सुरू असताना दोन जण सभागृहात उड्या मारतात. संसदेत धुराच्या कांड्या फोडतात. हा संपूर्ण प्रकार आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारा आहे. या विषयावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करणं, सहाजिक आहे. मात्र, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केल्यामुळं एक दोन नव्हे, तर तब्बल 148 खासदारांचं संसदेतून निलंबन करणं अतिशय खेदाची बाब असल्याचं शरद पवार म्हणाले.
इंडिया आघाडीत मायावतींचा विचार नाही : देशात जे काही सुरू आहे, त्या विरोधात आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली आहे. येणाऱ्या काळात इंडिया आघाडीला निश्चितच यश मिळेल. यासाठी इंडिया आघाडीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांची तयारी आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, इंडिया आघाडीसोबत आहे. मायावती यांना इंडिया आघाडीत घेण्यासंदर्भात समाजवादी पक्षाचा विचार सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळं सध्या तरी मायावती यांच्या संदर्भात आम्ही कुठलाच विचार केलेला नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
तिन्ही पक्षांचं मत घेऊनच उमेदवार ठरणार : अमरावती लोकसभा मतदारसंघ हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात आहे. असं असलं, तरी आता राजकीय समीकरण बदललं आहे. राज्यात निवडणुका संदर्भात कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार राहील, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना एकत्रित बसून योग्य निर्णय घेईल. आमदार बच्चू कडू यांच्या संदर्भात आम्ही कुठलाही विचार केलेला नाही. बच्चू कडू हे एका मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी मला चहा प्यायला बोलावलं. त्यामुळं मी त्यांच्याकडं चहा प्यायला जाईल, असं देखील शरद पवार म्हणाले.
समाजाला एक करण्याचे प्रयत्न व्हावे : मनोज जरांगे पाटील असो किंवा छगन भुजबळ असो राज्यात कोणीही दोन समाजांमध्ये फूट पडेल असे कृत्य करू नये. खरंतर सर्व समाजाला एक करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा -