अमरावती - ऑगस्ट 2020मध्ये अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू होणार होती. कोरोनामुळे विमानतळाचे काम रखडले. आज मी विमानतळ कामाचा आढावा घेतला असता राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याने बरेच काम रखडले आहे. आता राज्य शासनामे 50 कोटी रुपये दिले तर 2022मध्ये अमरावती विमानतळ सुरू होणे शक्य असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. अमरावती विमानतळाच्या कामाचा आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
नोव्हेंबर 2019मध्ये केली होती पाहणी
खासदार नवनीत राणा यांनी यापूर्वी 2019मध्ये अमरावती विमानतळाची पाहणी केली होती. त्यावेळी ऑगस्ट 2020मध्ये अमरावती विमानतळावरून विमान झेप घेणार, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या होत्या. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने विमानताळाचे काम रखडले आहे. अनेक कामाच्या निविदा निघाल्या. कंत्राटदारांनी काम सुरू केले मात्र राज्य शासनाने अनेक कंत्राटदारांना वर्कऑर्डर दिली नसल्याचे राणा म्हणाल्या.
विमान प्राधिकरणाचे मुख्य अभियंता शुक्रवारी अमरावतीत
अमरावती विमानतळाचे काम रखडल्यामुळे राणा यांनी विमान प्राधिकरणाच्या प्रमुखांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी शुक्रवारी विमान प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अमरावतीत येणार असून त्यावेळी सर्व अडचणी जाणून घेऊन काम सुरळीत मार्गी लागेल, असे विमान प्राधिकरण प्रमुखांनी राणा यांना सांगितले.