अमरावती - खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते बुधवारी रेल्वे स्थानकावर १०० फूट लांबीच्या तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार रवी राणा आणि माजी मंत्री आणि माजी आमदार डॉ. सुनील देशमुख आणि भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय रेल्वेने देशातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर शंभर फुटांचा तिरंगा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अमरावती रेल्वेस्थानकावर गुरुवारी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते कळ दाबून 100 फूट तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी रेल्वे पोलिसांच्यावतीने तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
आज आपल्या रेल्वेस्थानकावर तिरंगा ध्वज फडकतो आहे, हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी त्यांच्या हस्ते अमरावती रेल्वे स्थानकावर जलशुद्धीकरण प्रणालीचे भूमिपूजन करण्यात आले. जलशुद्धीकरण प्रणालीचे काम येत्या ७ ते ८ महिन्यात सुरू होणार असून रेल्वे स्थानकाजवळ वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याचे शुद्धीकरण याठिकाणी केले जाणार आहे.