अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी अशोक भुयार यांनी व्यापाऱ्याने फसवणूक केल्याने आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्यापूर्वी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत मृत्यूनंतर न्याय मिळावा यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहली होती. खासदार नवनीत राणा यांनी आज (शनिवारी) मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
अशोक भुयार यांच्या मृत्यूचा त्यांच्या भावाला धक्का बसल्याने त्यांच्या भावाचाही मृत्यु झाला होता. यामुळे एकाच कुटुंबातील दोघांचे जीव गेल्याने राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली. तसेच शेतकरी आत्महत्येला दोषी असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा - चौकशीदरम्यान 'ईडी'ला सहकार्य करू - एकनाथ खडसे
काय आहे नेमकी घटना?
अंजगाव सुर्जी तालुक्यातील धनेगावच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याने ऐन वेळी व्यापाऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे व पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आत्महत्या केलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याने आठ दिवसांपूर्वी व्यापाऱ्यासोबत संत्रा पिकाचा करार केला होता. परंतु, त्या करारावर व्यापारी कायम न राहल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला आणि यावादात शेवटी शेतकऱ्याचा बळी गेला. संत्र्याच्या झालेल्या करारामुळेच या शेतकऱ्याचा बळी गेल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
करार पद्धतीने होते संत्रा बागांची विक्री -
देशात सध्या कृषी कायद्यांवरून जोरदार आंदोलन सुरू आहे. तीन कृषी कायद्यातील एक कायदा करार शेतीचा आहे. या माध्यमातून काही कंपन्या शेतकऱ्यांसोबत करार करून त्यांचा शेतमाल खरेदी करणार असल्याचे बोलले जात आहे. याला आंदोलक शेतकरी विरोध करत आहेत. या कायद्यामुळे करार शेती हा शब्द आता चर्चेत आला असला तरी, हजारो संत्रा उत्पादक शेतकरी हे गेल्या अनेक वर्षांपासून आपली संत्री हे करार पद्धतीनेच विकतात. मात्र, जेव्हा बाजार पेठेत संत्र्याचे भाव कोसळतात तेव्हा, संत्रा व्यापारी झालेल्या कराराप्रमाणे फळं खरेदी करत नसल्याचे शेतकरी सांगतात. याच करार पद्धतीमुळे अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.