अमरावती : मेळघाटात मातामृत्यु आणि बालमृत्युचे प्रमाण हे अधिक आहे. मेळघाट म्हटले की, पर्यटन आणि एन्जॉय करण्याचे ठिकाण अशीच भावना अनेकांची आहे. दुर्दैवाने सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मेळघाट बाबतची भावना फारशी वेगळी नाही. त्यामुुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांचे प्रश्न, अडचणी, समस्या यांचे विशेष असे निवारण आजवर होऊ शकले नाही. यामुळेच ह्या भागात कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू असे प्रश्न आज देखील कायम आहेत.
बालमृत्यु दर : मेळघाटात 2021-22 मध्ये एकूण 7136 बालकांचा जन्म झाला. दुर्दैवाने यापैकी 411 बालकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये शून्य ते एक वर्षाच्या 150 बालकांचा समावेश होता, तर एक ते सहा वर्ष वयोगटात 45 तसेच, 0 ते 6 वर्ष वयोगटातील 195 बालक दगावले होते. यावर्षी 2022-23 मध्ये 6852 बालकांचा मेळघाटात जन्म झाला. यापैकी शून्य ते एक वर्ष वयोगटातील 131 बालक दगावले. एक ते सहा वर्ष वयोगटात 44 आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटात 175 बालक दगावलेत. 2021-22 मध्ये संपूर्ण मेळघाटात पाच मातांचा मृत्यू झाला. होता यावर्षी बाळंतपणात तीन माता दगावल्या आहेत. मेळघाटातील अतिदुर्गम गावात महाराष्ट्र वीज वितरण कंपनीसह काही खाजगी कंपनीच्या सीएसआर फंडातून वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या गावात वाहतुकीची कुठलीही साधने नाही, अशा ठिकाणी ही वाहने पोहोचून गरोदर मातांना बाळंतपणासाठी जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात पोचविण्यासाठी मदत होते आहे. काही गावांमध्ये मात्र अद्यापही अडचणी आहेतच.
'मिशन 28' चा सकारात्मक परिणाम : मेळघाटात मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा यांनी मिशन 28 हा अभिनव उपक्रम हाती घेतला. या उपक्रमा अंतर्गत गरोदर असणाऱ्या महिलेला नववा महिना लागताच तिची संपूर्ण 28 दिवस अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि डॉक्टरांच्या माध्यमातून संपूर्ण काळजी घेतली जात आहे. या 28 दिवसात गरोदर मातेने कुठले पोषक अन्न घ्यावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी. तिला आराम करायला मिळायला हवे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि डॉक्टर तिची पूर्णतः काळजी घेत आहेत.
मातेची काळजी : विशेष म्हणजे या मिशनमध्ये गरोदर असणाऱ्या महिलेचा पती तिची सासू यासह घरात असणाऱ्या सर्व मोठ्या व्यक्तींना सोबत घेऊन तिची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. महिलेने बाळाला जन्म दिल्यावर बाळाचे संगोपन कसे करावे, मातेने कुठला पोषण आहार घ्यावा, बाळाला दूध कसे पाजावे, याबाबत योग्य मार्गदर्शन अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या माध्यमातून दिले जाते. गत काही महिन्यांपासून हा उपक्रम संपूर्ण मेळघाटात राबविला जात आहे. त्यामुळे गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ राहत आहे. नवीन जन्माला आलेल्या बाळाला देखील आईचे दूध योग्य प्रमाणात मिळत आहे. तसेच बाळाला आवश्यक असणाऱ्या लस आधी योग्य वेळेत उपलब्ध केले जात आहे. मिशन 28 या उपक्रमामुळे संपूर्ण मेघाटात सकारात्मक चित्र निर्माण होत असल्याचे चिखलदरा केंद्राच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सालेह खान या 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाल्या.
अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची : मेळघाटात अति दुर्गम भागात अनेकदा कोणताही डॉक्टर किंवा कोणतीही सुविधा उपलब्ध नसली, तरी गरोदर मातांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अंगणवाडी सेविका मात्र प्रत्येक गावात उपलब्ध आहेत. फार पूर्वीपासून मेघाटातील आदिवासी बांधवांमध्ये असणारी अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे, असे बिहाली या गावात 27 वर्षांपासून सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका मंगला विधळे या 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना म्हणाल्या.
अज्ञान दूर करण्याचे काम : शून्य ते सहा वर्षाची बालक आणि गरोदर मातांना शासनामार्फत पुरेशा सुविधा या मिळतात. मात्र त्यांच्यामध्ये असणारे अज्ञान दूर करण्याचे काम मेळघाटातील प्रत्येक गावात असणाऱ्या अंगणवाडी सेविका करीत असल्यामुळे मेळघाटातील चित्र आता बदलायला लागले आहे. गरोदर मातांची नोंदणी करून त्यांच्यासाठी विशिष्ट कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमांमध्ये गरोदर महिला तिचे पती तिची सासू यांना मार्गदर्शन केल्या जाते. महिला गरोदर असल्यापासून तिने बाळाला जन्म दिल्यावर बाळ 1000 दिवसांचे होईस्तोवर काय काळजी घ्यावी, यासाठी मार्गदर्शन केले जाते. आम्ही वेळोवेळी गर्भवती महिला व तिच्या कुटुंबीयांची बैठक घेतो मार्गदर्शन करतो. ज्या महिला या बैठकीला येत नाही किंवा ज्यांच्या घरचे आमच्या मार्गदर्शनाकडे लक्ष देत नाही, त्याच घरात माता आणि बालमृत्यूची शक्यता अधिक जाणवते. मिशन 28 या उपक्रमामुळे मात्र आमच्या गावासह मेघाटातील प्रत्येक गावात बराच बदल जाणवतो, असे देखील मंगला विधळे यांनी सांगितले.
- हेही वाचा : Melghat child mortality मेळघाट बालमृत्यू , विधानभवनाला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारी माहिती
- हेही वाचा : Child mortality : भारतातील बालमृत्यू दराची सद्यस्थिती काय? जाणुन घ्या!
- हेही वाचा : 15,000 child marriages : राज्यात गेल्या तीन वर्षात 15 हजार बालविवाह सरकारची न्यायालयात माहिती