अमरावती - रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी या कोरोनाच्या महामारीत एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढा देत आहेत. मात्र, आता याच कोरोना योद्ध्यांना कोरोनाने वेढा घातल्याने अमरावतीच्या वैद्यकीय क्षेत्रावर एक प्रकारे कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. त्यातच संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नागरिकांसह प्रशानसनही चिंतेत पडले आहे.
अमरावतीमध्ये पहिला कोरोना रुग्ण 3 मार्चला आढळला होता. तेव्हापासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजाराची संख्या गाठण्याच्या तयारीत आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होते आहे. अमरावती शहरातील ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ, मेंदूरोग तज्ज्ञ, किडनी रोग तज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञ जनरल फिजिशियन,, पॅथलॉजिस्ट तसेच वडाळी परिसरात दवाखाना चालविणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत डॉक्टर आणि कोविड रुग्णालतात सेवा देणारे चिखलदरा येथील तालुका रुग्णालयाचे डॉक्टर यांनाही कोरोनाची लागण झाली. कोविड रुग्णलयात सेवा देणाऱ्या एकूण 15 जण कोरानाग्रस्त असून रुग्णालयातील 2 सफाई कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील मुख्य परिचरिकाही कोरोनाग्रस्त आहे. अमरावती महापालिकेच्या वडाळी येथील प्राथमिक उपचार केंदरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तसेच रुक्मिणी नगर परिसरात असणाऱ्या गेट लाईफ रुग्णालयात सुरक्षा रक्षकासह 6 परिचरिकांना कोरोना झाला. यासह डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील 8 ज्युनियर डॉक्टर कोरोनाग्रस्त असून 5 आरोग्य कर्मचारीही कोरानाग्रस्त आहेत. एकूणच डॉक्टरांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह यायला लागतच सर्वसामन्या नागरिकांमध्ये दवाखान्यात जायचीही भीती निर्माण झाली. गंभीर बाब म्हणजे एखाद्या कोरवनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याने या डॉक्टरांना कोरोना झाला असून या डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणाऱ्यांना कोरोनाग्रस्तां डॉक्टरांमुळे कोरोनाची लागण झाली आहे.
डॉक्टरांनीही स्वत:ची काळजी घेणे गरजेचेच-
कोरोना काळात पूर्ण काळजी घेऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोना होणे ही गंभीर बाब आहे. सध्या प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वसामान्यांनाच्या आरोग्यप्रमाणे डॉक्टरांचे आरोग्य योग्य राहायला हवे, हे सुद्धा महत्वाचे असल्याने आता डॉक्टर आणि त्यांच्याकडे येणाऱ्या रुगणांनी स्वतःच कोरोना होणार नाही किंवा आपल्यामुळे तो पसरणार नाही. याची काळजी घ्यायला हवी, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सचिव आणि कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. नीरज मुरके 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
कोरोनामुळे शासकीय वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या काळात अनेक डॉक्टरांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. अशा परिस्थितीमुळे खरं तर ज्या डॉक्टरांकडे पूर्वी 25 ते 30 रुग्ण यायचे तिथे आज 50 रुग्ण यायला लागले आहेत. या परिस्थितीत खरं सांगायचं तर डॉक्टर आणि रुगणांकडून प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचे डॉ. उज्वल बारंगे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. कोरोनाच्या सुरुवातीला डॉक्टर आणि रुग्णामध्ये 3 फूट अंतर असावे आशा मार्गदर्शक सूचना होत्या. त्यानंतर हे अंतर 7 फूट असावे, असं सांगण्यात आले आणि आता डॉक्टरांनी रुग्णांवर 13 फूट अंतरावरून उपचार करावे, असे सांगण्यात आले आहे. वास्तवात रुगणांना तपासायला निदान 6 फूट अंतर तरी लागतेच, असेही मत डॉ. उज्वल बारंगे यांनी यावेळी नोंदवले.
कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यासाठी सगळेच डॉक्टर खबरदारी घेत आहेत. डॉक्टरांकडे येणारे अनेक रुग्ण हे तोंडाला मास्क लावून येतात. डॉक्टरांसमोर आल्यावर मात्र ते तोंडाचा मास्क काडून बोलण्याचा प्रयत्न करतात, अनेकदा शिंकतात, खोकलतात. यामुळे खरे तर डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होत असण्याची भीती अधिक असल्याचे रेडियंट रुग्णालयाचे डॉ. स्वप्नील दुधाट यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
एकूणच कोरोनासाठी कुठल्याही जाती धर्माच्या, देशाच्या, प्रांताच्या भिंती नसून पेशाने डॉक्टर असणाऱ्या व्यक्तींनाही कोरोना आपला झटका देतोच. डॉक्टरांसह प्रत्येकाने काळजी बाळगणे, मास्कचा वापर करणे, विनाकारण बाहेर जाणे टाळणे, सॅनिटायझरचा सतत वापर करणे असे सर्व नवे नियम कायमस्वरुपी अंगिकारणे हीच काळजी गरज असल्याचेही डॉक्टरवर्गातून सुचित करण्यात आले.