अमरावती -राज्यभरातील लाखो ग्राहकांना लॉकडाऊन काळात आलेले हजारो रुपयांच्या थकीत बिलाची सक्त वसुली महावितरण कंपनीकडून सुरू आहे. जे लोक वीज भरत नाही अशा लोकांची वीज खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. दरम्यान महावितरणच्या या निर्णयाविरोधात अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. वीजबिल वसूली विरोधात वरुडमध्ये मनसेने तीव्र आंदोलन करत महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.
वीजबिल तोडणीविरोधात आक्रमक
वीजबिल न भरणाऱ्याची वीज खंडीत केली जात होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सभागृहात हा मुद्दा लावून धरण्यानंतर सरकारने वीज खंडीत केली जाणार नसल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर वीज तोडणी थांबली होती. परंतू अधिवेशन संपताच ऊर्जामंत्री यांनी वीजबिल सक्तीने वसूल करण्याचे आदेश दिल्याने मनसे आक्रमक झाली आहे. आज अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील महावितरणच्या कार्यालयात घोषणाबाजी करत मनसेने कार्यालयात तोडफोड केली. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.
हेही वाचा- जाणून घ्या, कोण आहेत हेमंत नगराळे?