अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्राच्या निर्णयाला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधत अवैध संपत्ती बाळगला असल्याचा आरोप केला आहे. खासदार नवनीत राणा आणि मला शिवसेनेकडून टार्गेट केले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून तशी खिचडी शिजवली जात असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगवेगळ्या देशात अवैध संपत्ती असून त्याची माहिती मी मिळवली आहे. लवकरच ही माहिती ईडीकडे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार राणा यांनी सांगितले.
आनंदराव अडसुळांनी दाखल केली होती याचिका-
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत राणा यांनी अनुसुचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार आणि तत्कालीन अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याचे म्हटले होते. 2014 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यांच्या जात वैधतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. 2019 मध्ये मात्र या अवैध जात प्रमाणपत्राच्या आधारावरच नवनीत राणा यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या.
या प्रकरणात आता आनंदराव अडसूळ यांच्यावतीने अॅड. कपिल सिब्बल खासदार राणांविरोधात बाजू मांडणार आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देणार किंवा आणखी पुढच्या तारखा मिळणार याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आमदार राणा यांनी मुख्यमंत्र्यांची परदेशात अवैध संपत्ती असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता या कुरघोडीच्या राजकारणात वेगळेच वळण लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.