अमरावती - कोरोनाच्या या महामारीमध्ये अमरावती जिल्ह्यातील जवळपास 900 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनामुळे ज्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे, अशा कुटुंबांची आमदार रवी राणा यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी 385 कुटुबांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
3 वर्षांचा पगार केला दान
कोरोनाचे संकट भयावह होते आहे. राज्यातील परिस्थिती अतिशय कठीण आहे. या महामारीत अनेकांच्या घरातील प्रमुख व्यक्ती दगावले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडले आहेत. या कुटुंबांना मदत व्हावी यासाठी मी माझा 3 वर्षांचा आमदारकीचा पगार दिला आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव त्यांच्या सोबत असेल, अशी प्रतिक्रिया यावेळी रवी राणा यांनी दिली आहे.
आजपासून किराणा वाटप
कोरोनाच्या या संकट काळात अमरावती आणि बडनेरा परिसरातील अनेक गरीब कुटुंबांना एकवेळचे जेवन देखील मिळत नाहीये, अशा कुटुंबांना आजापासून युवास्वाभिमानच्या वतीने किराणा वाटपाला सुरूवात करण्यात आल्याचे देखील रवी राणा यांनी यावेळी म्हटले.
ऑक्सिजन प्लँटसाठी आर्थिक मदत
कोरोनाच्या या संकट काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी कोविड रुग्णालयाला ऑक्सिजन प्रकल्पासाठी मी 10 लाख रुपये दिले आहेत, तसेच भातकुली येथे देखील ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी 20 लाखांची मदत केल्याचे आमदार रवी राणा यावेळी म्हटले.
हेही वाचा - उच्च शिक्षित शाह कुटुंबीयांनी स्वीकारलं जैन मुनीत्व, सोडली बड्या पगाराची नोकरी