अमरावती - राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील बिनविरोध निवडणूक लढविणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाख रुपये इतका विकास निधी आमदार देवेंद्र भुयार यांनी देण्याची घोषणा केली आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत बक्षिस म्हणून हा निधी देण्यात येणार आहे.
हेही वाचा - समता परिषद म्हणजे संपूर्ण ओबीसी समाज नाही, समीर भुजबळांच्या वक्तव्यावर ओबीसी संघटना आक्रमक
ग्रामपंचायती या ग्रामविकासाचा पाया समजल्या जातात. तर ग्रामपंचायतीची निवडणूक या लोकशाहीचा पाया समजल्या जाते. आजदेखील राज्यातील विविध गावांमध्ये निवडणुका सोडल्या तर अन्य बाबतीत गट-तट बाजूला ठेवून यात्रा-जत्रा आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचे उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागातील कष्टकरी आणि शेतकरी वर्गामुळे अजूनही माणुसकी टिकून आहे. तथापि कोणत्याही निवडणुका आल्या की, विशेषत: ग्रामीण भागात ईर्ष्या, चढाओढ, मी मोठा की तू मोठा, असे म्हणत निवडणुकांदरम्यान घमासान घडून धुमश्चक्री उडते. प्रसंगी संपूर्ण गावास वेठीस धरले जाते. निवडणुकांमध्ये दुभंगलेली मने पुन्हा कधीही जुळून येत नाहीत. त्यामुळे भावकी-गावकीत पिढ्यानपिढ्या हा संघर्ष सुरु राहतो. त्यामुळे गावाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर खीळ बसते. मात्र, त्यापेक्षाही गावातील निकोप वातावरण गढूळ होते, याची प्रचिती गेली काही दशके संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे.
निवडणूक संपूर्ण देशाला नवी दिशा देणारी ठरेल -
हेवे-दावे विरहित, ग्रामस्थांच्या वैचारिक सहकार्यातून बिनविरोध निवडणुका झाल्यास त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावच्या एकीद्वारे घेण्यात आलेल्या निवडणुका म्हणजे ‘गाव करील, ते राव काय करील’ ही म्हण सार्थ ठरविणाऱ्या या निवडणुका संपूर्ण देशाला नवी दिशा देणाऱ्या ठरतील. त्यामुळे हेवेदावे विरहित बिनविरोध निवडणुका कराव्यात”, असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. त्यामुळे हेवे-दावे विरहित, बिनविरोध निवडणुका विविध गावांतील ग्रामस्थांनी केल्या तर त्यागावांना स्थानिक विकास निधीमधून 25 लक्ष रुपये विकासात्मक निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.