अमरावती - लग्न सोहळ्यात सहभागी होऊन तिथेच दागिने आणि रोख रकमेवर हात साफ करणारी अल्पवयीन चोरट्यांचे टोळी राजपेठ पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजपेठ परिसरात दीपार्चन सभागृहात १९ फेब्रुवारीला एका लग्न सोहळ्यातून सोन्याचे ३ मंगळसूत्र, चांदीच्या तोरड्या आणि १ लाख ५० हजार रुपये रोख असणारी महिलेची पर्स चोरीला गेली होती. याबाबत राजपेठ पोलिसात तक्रार दाखल झाली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना २६ फेब्रुवारीला बडनेरा मार्गावरील वाईट हाऊस येथे आयोजित लग्न सोहळ्यातून चांदीचे १० शिक्के, २ मोबाईल फोन आणि २० हजार रुपये रोख चोरीला गेले होते.
दीपार्चन येथील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता काही अल्पवयीन मुले पर्स लपवीत असल्याचे आढळले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अरुण इंगळे, हेड कॉन्स्टेबल रंगराव जाधव, फिरोज खान, किशोर आंबूलकर, छोटेलाल यादव, राजेश गुरुले आणि दिनेश भिसे यांनी अल्पवयीन चोरट्यांचा शोध घेतला.
याप्रकरणी विलास नगर परिसरातील चौघांना ताब्यात घेतले. यापैकी तिघे हे अल्पवयीन आहेत तर सुरज परमार (वय २१) हा सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले. या चौघांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली असता लग्न सोहळ्यात सहभागी होऊन लग्नात वधू वरांना मिळणाऱ्या भेटवस्तू, पैशांची पाकिटे, महिलांच्या पर्स ही टोळी मोठ्या शिताफीने पळवीत असत.