अमरावती - शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत 28 उमेदवार रिंगणात असले, तरीही महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांचा विजय, ही काळ्या दगडावरची रेष आल्याचा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी उदय सामंत सध्या अमरावती विभागाच्या दौऱ्यावर आहेत. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्रीकांत देशपांडे यांच्यासह माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार अनंत गुढे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. राजेंद्र गवई उपस्थित होते.
विद्यापीठाच्या पदवीबाबत संशय नको
कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा घेऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या. केवळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गोंधळ उडाला. विद्यापीठांनी ऐनवेळी महाविद्यालयांना परीक्षा घ्यायला लावली. मात्र विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणपत्रिका आणि पदवी यावर कोरोना आप्तकाल वगैरे उल्लेख नसेल. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आणि पदवी दोन्ही बाबत कुठलीही शंका बाळगू नये, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
आम्ही महाविकास आघाडीसोतच - डॉ. राजेंद्र गवई
आम्ही 90 टक्के महाविकास आघाडीसोबत असतो. अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांच्या विरोधात मी निवडणूक लढल्यामुळेच बच्चू कडू निवडून आलेत, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. राजेंद्र गवई म्हणाले. बच्चू कडू देखील हे मान्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. आता केवळ अमरावतीत नव्हे, तर महाविकास आघाडीचे उमेदवर अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे या शिक्षक मतदारसंघात तसेच एका पदवीधर मतदारसंघात आमची आघाडी झाल्याचे गवई म्हणाले.