अमरावती - राज्यमंत्री बच्चू कडू हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आगळ्या वेगळ्या पध्दतीने काम करणारा नेता म्हणुन राज्यमंत्री बच्चू कडू यांचं नाव प्रामुख्याने घेतले जाते. बच्चू कडू यांनी वीस वर्षांपूर्वी नायक चित्रपट पाहिला आणि एक उपक्रम हाती घेतला.आज त्या उपक्रमाला जवळपास वीस वर्षे पूर्ण होत आहे. बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या राहुटी उपक्रमाचे नाव आता कर्तव्य यात्रा करण्यात आले आहे. या कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांना एकत्र आणून नागरिकांच्या कामांची पूर्णतः केली जाते. बच्चू कडू यांच्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून आजवर लाखो नागरिकांचे कामे या उपक्रमातून निकाली आहेत.
प्रकरणांचा तात्काळ निपटारा -
कोरोनाकाळात सततच्या निर्बंधामुळे अनेकांची विशेषतः ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांची विविध सरकारी योजनांची कामे रखडली. परिणामी गेले दीड वषार्पासून त्यांना शासकिय लाभापासून वंचित रहावे लागले. याची दखल घेत राज्यमंत्री बच्चु कडु यांनी चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून राहुटी उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला असून यात्रेची सुरूवात १९ नोव्हे. रोजी अचलपूर तालुक्यातील आदर्श विद्यालय भुगाव येथून करण्यात आली. समारोप बाल मुकुंद राठी विद्यालय सिरजगाव कसबा येथील राहुटी उपक्रमातून झाली आहे. या कर्तव्य यात्रेत सर्व ग्रामस्थांची सर्व शासकिय विभागातील प्रलंबित कामांचा निपटारा जागेवरच होत आहे. यासाठी एकाच ठिकाणी सर्व विभागातील अधिकारी उपस्थित राहून त्यांच्या अखत्यारीतील निर्णय घेतले जातात.
अनेक योजनांची माहिती -
राज्यमंत्री म्हणून कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून जनतेची प्रलंबित कामे जागेवरच करण्यासाठी अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील १९ ते २७ नोव्हे या कालावधीत सुमारे १२५ गावात सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याला सुरूवात केली आहे. या उपक्रमात लाभार्थ्यांना पासपोर्ट फोटो जागेवरच अल्पदरात उपलब्ध होणार असून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना, शिधापत्रिकांसह विविध योजनांचे अर्ज मोफत मिळणार आहेत. तसेच या संबंधित योजनांचे अधिकारी या राहुटीत जातीने उपस्थित राहणार असल्याने जागेवरच लाभार्थीची प्रलंबित कामे पुर्ण केल्या जातात.
कर्तव्य यात्रेची वैशिष्ट्ये -
उपक्रमातून जवळपास नव्वद टक्के काम यशस्वी होते. गरीब सर्वसामान्य, अशिक्षित ज्या लोकांना योजना माहीत नाही, अशा लोकांना या कर्तव्य यात्रेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. बच्चू कडू आमदार झाले तेव्हापासून ही यात्रा सुरू आहे. आधी राहोटी नाव होते. आता मंत्री झाल्याने कर्तव्य यात्रा म्हणून नाव केले आहे. एका गावात परिसरातील दहा गावातील लोक कामे घेऊन येतात. झेरॉक्स, फोटो, स्टँम आदी कागदपत्रे व फॉर्म एकाच ठिकाणी मिळतात. सर्व विभागाचे अधिकारी इथं असतात. रेशन कार्डला दोन दोन महिने थांबावे लागते. परन्तु या यात्रेच्या माध्यमातून एका दिवसातच लाभार्थ्यांला रेशन कार्ड दिले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून भ्रष्टाचार थांबला आहे. तसेच आता हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा मानस बच्चू कडू यांचा उपक्रम आहे.