अमरावती - संत्रा विकल्यावर व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व नंतर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील एका शेतकऱ्याने केला होता. याबाबत शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून न्यायाची मागणी करत आत्महत्या केली होती. याप्रकरणी आता कडू यांनी विरोधकांना धारेवर धरत, या प्रकरणावर विरोधक राजकारण करत असून, मला बदनाम करण्याचा डाव विरोधक रचत असल्याचे विधान कडू यांनी केले आहे.
मला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव
शेतकरी व त्यांचे बंधू मृत्यूमुखी पडले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी माझ्या नावे जी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली, ती सहानुभूती आणि न्यायाच्या आशेने लिहिली होती. जर, मृत्यूपूर्वी आम्हाला माहीत असते, तर आत्महत्या आम्हाला थांबवता आली असती. मात्र, काही विरोधक या प्रकरणातून राजकारण करू पाहात आहेत. मला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. याप्रकरणी जी काही चौकशी लावायची आहे ती लावून आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ व त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहू. त्याच्या कुटुंबाला भेट देऊ, अशी माहिती कडू यांनी दिली.
हेही वाचा - अमरावतीच्या वरुड तालुक्यात आढळला मृत अवस्थेत नर बिबट्या
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, लहान भावाच्या मृत्यूचा धसका घेत मोठ्या भावाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - अमरावतीच्या वरुड तालुक्यात आढळला मृत अवस्थेत नर बिबट्या