अमरावती - दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या शेकडो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच करीत आहेत. त्या दरम्यान आज राजस्थानच्या भरतपूर येथील गुरुद्वारामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज रक्तदान केले. यावेळी बच्चू कडू यांनी 'मोदीजी खून लो, मगर जान मत लो' असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
देशामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे बच्चू कडू यांनी रक्तदान केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना स्वेच्छेने रक्तदान करायचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
राज्यमंत्री बच्चू कडू हे हजरो शेतकरी व कार्यकर्त्यांसह दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघाले आहे. याच प्रवासा दरम्यान आठ तारखेला बच्चू कडू हे शिवपूरी मध्ये चक्का जाम आंदोलनात सहभागी झाले होते. बच्चू कडू यांचे ठीक ठिकाणी स्वागत होत आहे. बुधवारी बच्चू कडू यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरला होता. त्यामुळे त्यांनी राजस्थान मधील भरतपूर येथील गुरुद्वारा मध्ये मुक्काम केला. आज ते पुढील प्रवासाला रवाना होणार होते. तत्पूर्वी त्यांनी आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांनी रक्तदान केले.
आज दिल्लीत होणार दाखल -
पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारने नुकतेच आणलेले नवीन कृषी आणि कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसह ते दिल्लीकडे जात आहे. यावर केंद्रसरकारकडून दडपशाहीचे धोरण अवलंबले जात आहे.शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी होण्यासाठी बच्चू कडू दिल्लीकडे निघाले आहेत.आज भरतपूरमधून बच्चू कडू यांचा ताफा दिल्लीच्या दिशेने रवाना झाला असून ते आजच दिल्लीत दाखल होणार आहेत.
यापूर्वीही अनेकवेळा रक्तदान-
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यापूर्वी ही अनेकवेळा आंदोलना दरम्यान रक्तदान शिबीर घेतले होते. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी बच्चू कडू यांनी स्वता रक्तदान केले होते.