अमरावती: शहरातील उमेश प्रल्हाद कोल्हे (५५) रा. घनश्यामनगर या मेडिकल व्यावसायिकाची चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या (Medical Professionals Violent Murder) करण्यात आली. ही धक्कादायक घटना मंगळवार, २१ जून रोजी रात्री 11 च्या सुमारास न्यू हायस्कूल समोर घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.
तिघांपैकी एकाने केला गळ्यावर वार : त्यामुळे उमेश यांनी दुचाकी थांबविली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने चाकूने उमेश यांच्या गळ्यावर वार केला तर ईतरांनीही मारहान करण्यास मदत केली. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.
नुपूर शर्मा प्रकरणाशी सबंध तपासावा : ठाणेदार निलिमा आरज आपल्या ताफ्यासह घटनास्थळी आले. गुन्हे शाखेच्या पथकानेही पाहणी केली. या प्रकरणी मृतक उमेश यांचा मुलगा संकेत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान कोल्हे यांच्या खूनाचे कारण समोर येत नाही. या प्रकारात लुटपाट झाल्याचेही दिसत नाही. खून प्रकरण नुपूर शर्मा वादग्रस्त प्रकरणाशी सबंधित आहे का, याचा तपास एनआयए ने करावा अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
खुन लुटमारीसाठी नाही : या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद (२४) रा. मौलाना आझाद कॉलनी, मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम (२२) रा. बिसमिल्लानगर, शाहरूख पठाण हिदायत खान (२४) रा. सुफियाननगर, अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम (२४) रा. बिसमिल्लानगर व शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२) रा. यास्मीननगर यांना अटक करण्यात आली आहे. कोल्हे यांचा खुन लुटमारीसाठी झाला असल्याचे निदर्शनास येत नाही. आरोपींनी लुटण्यासाठी चाकू मारला असता तर सोबतचे सामान, पैसे ते घेऊन पळाले असते. शिवाय, या खून प्रकरणात पकडलेले आरोपी यापूर्वी कुख्यात म्हणून प्रसिद्ध नाहीत.
एनआयए तपासाची मागणी: नुपूर शर्मा यांच्या बाजूने समर्थन केल्या मुळे खुन झाला असावा असी चर्चा आहे. (Murder Nupur Sharma Case Suspicion ) हे आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का ? कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या का ? त्यांना धमक्या मिळाल्या होत्या का? त्यांना या महिनाभरात कोणाकोणाचे व कुठून फोन आले ? ते विशिष्ट समाजाच्या लोकांचे होते का , अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता हा तपास एनआयए ने ( National Investigation Agency )करावा. याची पाळेमुळे शोधण्याची आवश्यकता आहे. अमरावती संवेदनशील होऊ नये, पुन्हा अमरावतीतील सामाजिक सौहार्द खराब होऊ नये. यासाठी या प्रकरणाचा योग्य व कठोर तपास करून कारवाई व्हावी अशी विनंती शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
एनआयए पथकाकडून चौकशी: उमेश कोल्हे खून प्रकरण नुपूर शर्मा वादग्रस्त प्रकरणाशी सबंधित आहे का, याचा तपास दोन दिवसांपासून एनआयएच्या चार ते पाच जणांच्या पथकाकडून केला जात आहे. एनआयए चे पथक कोतवाली पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आज पहाटे डॉ.युसूफ खान बहादूर खान यास अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप हाती लागले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा खून नुपूर शर्मा यांच्या बाजूने समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या म्हणून झाल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांनी याबाबत दुजोरा दिलेला नाही.