अमरावती - कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी अनेक संस्था-संघटना पुढे येत आहेत. जिल्ह्यातील विविध गावांतून रुग्ण अमरावतीत उपचारासाठी येतात. त्यावेळी त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून भोजन सुविधा देण्याचा उपक्रम शिवशक्ती क्रीडा मंडळाने हाती घेतला आहे. येथील शिवशक्तीनगर परिसरातील शिवशक्ती क्रीडा मंडळ गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या संवेदनशील कार्यकर्त्यांचे संघटन असून, कोविडकाळात त्यांच्याकडून हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे.
रोज जेवणाच्या दोनशे पाकिटांचे वितरण -
मंडळाकडून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय स्थित जिल्हा कोविड रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन रुग्णालय) येथे रोज रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची दोनशे पाकिटे वितरित करण्यात येतात. रोज सकाळी साडेदहा वाजता या रुग्णालयाच्या परिसरात गरजूंना भोजन पुरवले जाते. ही सेवा यापुढेही अविरत सुरू ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे.
उपक्रमात यांचा सहभाग -
विविध क्षेत्रात काम करणारे मंडळाचे सदस्य या उपक्रमासाठी योगदान देतात. मंडळाचे अमोल कराडे, देवेंद्र पाथरे, दामोदर डोंगरे, अमित तळोकार, आशिष पाटील, सचिन लोहोटे, मंगेश सोनवणे, अनुप चव्हाण, महेंद्र पठाडे, शैलेश राणे, राहुल चव्हाण, मंगेश सोनवणे, केशव सोनवणे, नितीन सोनवणे, प्रतीक पाटील, सौरभ लांडगे, अभिजीत लांडगे, राज डोंगरे, नीलेश पेंदूर, दिलीप पुरी, तेजल समुद्रे, गजानन डवले, दिनेश डवले, विनय रहाटे, योगेश राणे, आशुतोष रायटर, सतीश कुलकर्णी, सुनील दाते, शुभम धवांजेवार तसेच शिवशक्तीनगर परिसरातील नागरिकांचे उपक्रमाला सहकार्य लाभते.