अमरावती - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या असंख्य हुतात्म्यांना आदारांजली वाहण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढयासह देशाच्या प्रगतीत काँग्रेसचे असणारे योगदान नव्या पिढीला कळावे. या उद्देशाने क्रांती दिनानिमित्त जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती शहरात मशाल रॅली काढण्यात आली.
नव्या पिढीला भारताचा खरा इतिहास कळावा आणि भारताला विकसित करण्यात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पासूनच झालेली सुरुवात आजच्या तरुणाईसमोर यावी, या उद्देशाने अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या संकल्पनेतून अमरावती शहरात मशाल रॅली काढण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला केलेले अभिवादन -
शहरातील सायन्सकोर मैदान येथून मशाल रॅलीला सुरुवात झाली. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी मशाल पेटविली. यावेळी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते हातात मशाल घेऊन सहभागी झाले होते. सायन्स कोअर मैदान येथून राजकमल चौक ते जास्त चौकापर्यंत जाणाऱ्या उड्डाणपुलावरून ही मशाल रॅली निघाली. जयस्तंभ चौक येथील राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांनी हारर्पण केले.
राजकमल अभिवासन सोहळा -
जयस्तंभ चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर मशाल रॅली राजकमल चौकात पोहोचली. यावेळी राजकमल चौक येथे आयोजित अभिवादन सोहळ्याला पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि आमदार सुलभा खोडके यांनी संबोधित केले. यावेळी उपस्थितांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
देशाला पांढऱ्या फंगसची लागण -
1942 साली काँग्रेसच्या भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली आणि 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यलढ्यात अनेक जण शहीद झाले काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिल्यावर देशाला विकासाची दिशा दिली. मात्र, आज देशाला पांढऱ्या फंगसची लागण झाली आहे. नव्या पिढीला देशाचा खरा इतिहास कळावा आणि देशाला लागलेली कीड नाहीशी व्हावी, या उद्देशाने आज काँग्रेसने मशाल रॅली काढली असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा - VIDEO : कायद्याचा बालेकिल्ला म्हणजे अमरावती जिल्हा म्हणणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित
हेही वाचा - अमरावती जिल्ह्यातील 337 शाळांची आजपासून वाजणार घंटा