अमरावती - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन आज (शनिवारी) तिवसा नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरांनी तिवसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष वैभव वानखडे यांना मागण्याचे निवेदन दिले.
ओबीसी घरकुलाचा मुद्दा व इतरही मुद्दे लवकर निकाली काढावे व सोबतच प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे चेक लवकरच लाभार्थ्यांना देण्यात यावे, या मागण्या घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पक्षाच्या कार्यालयापासून सुरू झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांनी या मोर्चात सहभागी होऊन सरकार विरोधात घोषणा दिल्या.
अनेक दिवसापासून ऑनलाईन घरकुलसाठी अर्ज करणाऱ्या ओबीसी समाजाच्या लोकांना घरकुलचा लाभ मिळावा, शासकीय जागेवर व गावालगतच्या जागेवर अनेक वर्षापासून झोपडीत राहत असणाऱ्या नागरिकांच्या झोपड्या शासन निर्णयानुसार नियमाकुल करा, तिवसा शहरात आवश्यक ठिकाणी स्त्री व पुरुषांसाठी शौचालयांची व्यवस्था करा, यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला, अशी माहिती मोर्चेकरांनी दिली.