अमरावती - कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेसह सर्वच जण अडचणीत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही वीज वितरण कंपनीने वीज देयक चौपटीने वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचा अंत पाहू नका, असे म्हणत या वीज देयकाला खासदार नवनीत राणा यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच हे वाढीव देयक आम्हाला मंजूर नसल्याचे खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.
वाढीव वीज देयकाविरुद्ध नवनीत राणा यांनी विद्युत भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी वीज कंपनीच्या मुख्य अभियंता सुमित्रा गुर्जर यांच्याशी वाढीव वीज देयकाबाबत चर्चा केली. सध्याच्या परिस्थितीत कोणाच्याही घरी जाऊन मीटर न तपासता वीज कंपनीने जे देयक काढले ते चुकीचे आहे. शेतकरी, शेतमजूर सर्वच अडचणीत आहेत. सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप यावेळी नवनीत राणा यांनी केला.
हेही वाचा - कोरोना रुग्णांची हेळसांड थांबणार; आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती
ज्या लोकांना 300, 400 असे वीज देयक यायचे त्यांना दोन हजार, तीन हजार असे देयक आकारण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांची आर्थिक घडी विस्कटली असताना त्यांची वीज देयकाच्या माध्यमातून लूट करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिला.
तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी तत्काळ वीज पुरवठा देण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देशही खासदार राणा यांनी दिले आहेत. यावेळी नगरसेवक आशिष गावंडे, सुमती ढोके, जितू दुधाने, नितीन बोरेकर, सुनील राणा, उमेश ढोणे, हर्षल रेवणे, नितीन नासाने, पराग चिमटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.