अमरावती - ग्रामीण भागात पावसाने जराही खंड दिला की गोवोगावी भराडी समाजातील तरुण जाऊन त्या गावात धोंडी काढायचे. धोंडी गावात आली की पाणी येतच ही भावना शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे 'धोंडी-धोंडी पाणी दे दाय दाना पिकू दे' असे साकडे हे भराडी समाजातील तरुण निसर्गाकडे घालतात. निसर्गाकडे साकडे घालून शेतकऱ्यांचे घर धान्याने भरू दे, म्हणणाऱ्या या लोकांवरच आता लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे.
हेही वाचा - 'ही' शेवटची रात्र असेल असं वाटलं; पण पत्नीला पाहिले अन् मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलो - डॉ. पारकर
उघडं शरीर, कमरेला बांधलेला कडूलिंबाचा पाला, दोघांच्या खांद्यावर लांब काठी तिला बांधलेले बेडूक, साथीला चार माणसं, एका हातात खंजेरी असे दृश्य हे धोंडीचे असते. अमरावतीच्या माळेगाव या १८०० लोकवस्तीच्या गावात मोठया संख्येने भराडी समाज राहतो. या लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे तळव, गोनी शिवणे तर अनेक कुटुंब मृग नक्षत्रामध्ये गावोगावी जाऊन धोंडी धोंडी पाणी दे दाय दाना पिकू दे, असे साकडे निसर्गाकडे घालतात. धोंडी निघाली की पाणी येतेच अशी भावना शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ते या लोकांना थोडे धान्य व काही पैसे देतात.
चार महिने गावोगावी फिरायचे, धान्य जमा करायचे आणि वर्षभराच कुटूंबाला जगवण्याचे असे गणित मांडायचे हे या लोकांचे काम आहे. पण कोरोना आला आणि याचा फटका या लोकांना बसला. इतर गावातील लोक या लोकांना गावात घेत नसल्याने धोंडी धोंडी पाणी दे दाय दाना पिकू दे, हा सूर यंदा मात्र त्यांच्या गावापुरताच मर्यादित राहिला आहे.
जून महिना सुरू झाला की पावसाळा लागतो. शेतकरी त्याच्या शेताचे गणितं जुळवण्यासाठी व्यस्त होतो. त्यात अनेकदा पाऊस दडी मारतो. त्यामुळे मग गावोगावी धोंडी काढून धोंडी धोंडी पाणी दे असे म्हणत हे भराडी लोक गावी जातात. परंतु, यावर्षी हे सर्व थांबल्याने याचा फटका या लोकांना बसला आहे.
हेही वाचा - विशेष मुलाखत : 'खासगी रुग्णालयांनी जास्त पैसे आकारल्यास थेट कारवाई करू'
हिरामण सावंत सांगतात, गावोगावी जाऊन अन्न मागणे तसेच गावापासून चार महिने दूर राहावे लागते. चार महिन्यांपासून गावातून दूर असल्याने आम्ही चार महिन्यांनी गावात परत येतो. तेव्हा आमच्याकडे वर्षभराच्या अन्नधान्याची सोय झालेली असते. मात्र, या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आम्हाला गावातील लोक गावात प्रवेश नाकारत असल्याने या वर्षी जगावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या धोंडीचे महत्व म्हणजे शेकडो वर्षे चालत आलेली ही परंपरा आहे. पाऊस आला नाही किंवा पावसात खंड पडला की या गावातील भराडी समाजाचे लोक धोंडी काढतात व वरूणराजाला प्रसन्न करण्याचे काम करतात. त्यामुळे ही शेकडो वर्षांपासून धोंडी काढण्याची प्रथा आहे. शेतकऱ्यांना दाय दान पिकू दे, अशी आर्जव घालणाऱ्या भराडी समाजातील लोकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.
दरम्यान, शेकडो वर्षांपासून असलेली धोंडीच्या परंपरेला कोरोनामुळे खंड पडू नये म्हणून या तरुणांनी यावर्षी आपल्या गावातच धोंडी काढून त्यांची परंपरा कायम ठेवली आहे. लॉकडाऊनचा फटका बसल्याने खेडोपाडी जाणे बंद असल्याने धोंडी काढणे शक्य नव्हते. परंतु, या परंपरा कायम राहाव्यात म्हणून या वर्षी आम्ही धोंडी गावातच काढली असून, ही परंपरा कायम ठेवली आहे. मात्र, आता आम्हाला सरकारने अन्न धान्याची सोय करावी, अशी मागणी राजेंद्र शिंदे यांनी केली आहे.