अमरावती- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अमरावती शहर लॉकडाऊन असताना मंगळवारी रात्री चोरट्यांनी अमरावती- परतवाडा मार्गावरील देशी दारूच्या गोदामाची भिंत फोडून साडेपाच लाख रुपये किमतीची दारू लंपास केली.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वलगावलगत अग्रवाल यांचे देशी दारूचे गोदाम आहे. बुधवारी सकाळी गोदामाच्या भिंतीला मोठे छिद्र पाडलेले आढळून आले. तसेच गोदामाचे शटर फोडण्याचा प्रयत्न केल्याचेही आढळून आले.
दरम्यान, याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती मिळताच ते गोदाम परिसरात पोहोचले. यावेळी गोदामात ठेवलेल्या देशी दारूच्या अडीचशे पेट्या चोरून नेल्याचे समोर आले. चोरी गेलेल्या देशी दारूची किंमत साडेपाच लाख रुपये आहे. पोलिसांनी पंचनामा केल्यावर भिंतीचे छिद्र सिमेंट- रेतीने बुजविण्यात आले.