अमरावती - दारूचा दूरदूरपर्यंत संबंध नसताना एका शिक्षकाच्या घरी थेट ऑनलाईन पद्धतीने दारू पोहोचली. कुरियरने दारूच्या दोन बाटल्या घरी येताच कुरिअरवाल्याने 1200 रुपये मागितले. त्यामुळे शिक्षकाची चांगलीच तारांबळ उडाली. अमरावती शहरातील बुधवरा परिसरात हा सारा प्रकार घडला.
शरद गढीकर हे शिक्षक असून बुधवरा परिसरात त्यांचे घर आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्याकडे कुरिअर घेऊन एक व्यक्ती आला. त्याने तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केल्याप्रमाणे दारूच्या दोन बाटल्या आल्या असल्याचे सांगताच शरद गढीकर यांना धक्काच बसला. शरद गढीकर यांच्या पत्नी हा सारा प्रकार आश्चर्याने पाहत होत्या. मी दारू पित नाही, तर ऑनलाईन ऑर्डर देण्याचा प्रश्नच नाही, असे शरद गढीकर कुरिअरवाल्याला म्हणाले. तेव्हा मला ते माहिती नाही 1200 रुपये द्या आणि मला जाऊ, असा तगदा कुरिअरवाल्याने लावला.
दरम्यान, शरद गढीकर यांनी मी दारू बोलावली नाही. दारू दुकान मालकाशी बोलतो असे म्हटल्यावर, 'ऑर्डर दिली नाही, असे लिहून द्या मी दोन्ही बाटल्या घेऊन निघून जातो.', असे कुरिअरवल्याने म्हणताच शरद गढीकर यांनी तसे लिहून दिले. त्यानंतर घरी दारू पाठविणाऱ्या दारू दुकानमालकाशी संपर्क साधला. यावर दुकानात गर्दी आहे. पाहून नंतर सांगतो, असे उत्तर दारू विक्रेत्याने शरद गढीकर यांना दिले. मात्र, सलग तीन दिवस गढीकर यांच्या फोनला प्रतिसाद देत नसलेल्या दारू विक्रेत्याच्या व्हॉट्सअॅपवर तुझी तक्रार करतो, असा संदेश शिक्षकाने पाठवला. त्यानंतर दारू विक्रेत्याचा फोन आला. गाडेकर नावाची व्यक्ती आमची नियमित ग्राहक आहे. ते दस्तुरनगर भागात राहतात. त्यांनी दारूची ऑनलाईन ऑर्डर दिली आणि आमची चूक झाल्याने ती दारू तुमच्या घरी पोहोचली, असे उत्तर दारू विक्रेत्याने दिले. दस्तुरनगरच्या व्यक्तीचे आडनाव गडेकर हे गढीकर या आडनावाशी मिळते जुळते असले, तरी दस्तूरनगर आणि बुधवरा परिसर यातील अंतर फार लांब आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे खोडसाळपणा असू शकतो, असे शरद गढीकर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. ऑनलाईन ऑर्डरशिवाय दारू मिळत नाही. माझा दारूशी संबंध नाही, तरी मला घरपोच दारू मिळते हा प्रकार हसावे की रडावे, असाच असल्याचे शरद गढीकर म्हणाले.