अमरावती Leopard Terror in Amravati : अमरावती शहरातील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था परिसरात गतकाही महिन्यांपासून असणाऱ्या बिबट्याची दहशत कायम असताना आता पहाडांनी वेढलेल्या मंगलधाम परिसरात रात्री अंधार पडताच दोन मोठे बिबटे बिनधास्त संचार करीत असल्याचं समोर आलंय. स्थानिक रहिवाशांनी या दोन्ही बिबट्यांना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले असून हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
आठ दिवसांपासून वाढली भीती : मंगलधाम आणि महादेव खोरी हे लागून असलेले दोन्ही परिसर पूर्वी असणाऱ्या घनदाट जंगल भागात वसले आहेत. गत दहा वर्षांपासून या भागात शेकडो घरं झाले असून या ठिकाणी अधूनमधून बिबट्यांसह वाघाचेदेखील दर्शन अनेकांना घडते. मात्र मागील काही महिन्यांपासून वन्यप्राणी दिसेनासे झाले होते. पण आता पुन्हा एकदा धष्टपुष्ट आणि जवळपास माणसाच्या उंचीपर्यंतचे दोन बिबटे सलग आठ दिवसांपासून रात्रीच्या अंधारात निळकंठ लेआउट परिसरात रोज रात्री फिरत आहेत. या भागातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीती वाढली आहे.
भीतीसह बिबट्याला पाहण्याची उत्सुकता : मंगलधाम परिसरात उंच टेकडीवर असणाऱ्या गौरक्षण संस्थेच्या जागी लागूनच असणाऱ्या श्रीनिवास अपार्टमेंट येथे राहणाऱ्या अनेकांना गत आठ दिवसांपासून बिबट्या कधी रात्री आठ वाजता तर कधी रात्री दोन दरम्यान आपल्या घराच्या खिडकीतून दिसतोय. शनिवारी रात्री या अपार्टमेंटमधील अनेक रहिवासी इमारतीच्या छतावर चढून लगतच्या घनदाट झुडपात बिबट्या दिसतो का हे पाहण्यासाठी उत्सुक होते. पाडावरील आणि इमारती समोरील झुडपांमध्ये मोठ्या टॉसचा लाईट लावून बिबट्याचा शोध घेतला जात होता. हे बिबटे नेमक्या कोणत्या मार्गानं परिसरात येतात आणि परिसरातील डुक्कर, कुत्र्यांची शिकार करून कुठल्या मार्गानं निघून जातात याची माहितीदेखील या अपार्टमेंटमधील रहिवाशांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
वनविभागाने लक्ष देण्याची मागणी : मंगलधाम परिसरात दोन बिबटे रात्रीच्या अंधारात रोज मुक्त संचार करीत असल्याचं दिसत असताना वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून होत आहे. या संदर्भात वनविभागाला तक्रार दिली असता, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी शनिवारी सायंकाळी ज्या भागातून बिबट येतो त्या भागाची पाहणी केली. या भागातील लहान मुलांना सायंकाळी सहानंतर घराच्या बाहेर निघण्यास बंदी करण्यात आली. दरम्यान, या परिसरापासून काही अंतरावरच मालखेडच्या जंगल परिसरात प्रदीप मिश्रा यांचे 16 डिसेंबरला शिव कथेचे आयोजन करण्यात आलं आहे. त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात जंगल कापले जात आहे. सुमारे 12 ते 13 एकर जंगल सपाट झाल्यामुळं बिबटे आता नागरी वसाहतीत आले असावे असंदेखील बोललं जातंय.
विदर्भ महाविद्यालय परिसरातील बिबट्या अद्यापही मोकळाच : विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था परिसरात असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह लगतच्या भागात बिबट्याचा अनेक दिवसांपासून मुक्काम आहे. त्यामुळं या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून पिंजरा देखील ठेवण्यात आलाय. मात्र, हा बिबट्या अद्यापही पिंजऱ्यात अडकला नाही. दरम्यान, शहराच्या दोन्ही टोकांवर बिबटे धुमाकूळ घालीत असून या बिबट्यांना पकडण्याचं मोठे आव्हान वन विभागासमोर आहे.
हेही वाचा -