अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी कोरोनाचे नियम पाळून आजपासून सुरू करण्यात येत आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. त्याचं अनुषंगाने आता कोरोनाचे नियम पाळून व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
दीड महिन्यांपूर्वी कोरोनाचा आलेख कमी झाला. दऱयाखोऱ्यात वसलेल्या मेळघाट परिसरात चिखलदरा पर्यटन सुरू करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ३ दिवसातच चिखलदरा व मेळघाट व्याघ्र प्रकल्पात होणारी जंगल सफारी मात्र पुन्हा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे चिखलदरात जंगल सफारी करणारे गाईड व जिप्सी चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
जंगल सफारी शनिवार, रविवार राहणार बंद -
जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोना नियमाचे पालन करून जंगल सफारीला परवानगी दिली आहे. पर्यटकांचा कोरोना चाचणी अहवाल या करिता निगेटिव्ह असणे गरजेचे आहे. सोबतच पर्यटनादरम्यान पर्यटकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. यासोबत जंगल सफारी ही शनिवार व रविवार या दिवसात बंद राहणार असल्याचे आदेशात म्हंटले आहे. त्यामुळे निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर पर्यटकांनी कोरोना नियम पाळणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम न पाळल्यास पर्यटकांना पर्यटन करता येणार नाही.