अमरावती - मागील आठवडाभर अंगाची लाही-लाही करणाऱ्या विदर्भातील नागरिकांना आता काही अंशी उन्हापासून दिलासा मिळणार आहे. शनिवार (दि. 30 मे) अमरावतीत एका दिवसात पारा तीन अंशांनी खाली उतरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आजपासून पुढील चार दिवस विदर्भात काही ठिकाणी हलक्या व मध्यम वृष्टी होणार आहे, असा विश्वास शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभाग प्रमुख डॉ. अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे.
माहिती देताना डॉ. अनिल बंड पश्चिम विदर्भ अंतर्गत तामिळनाडू मार्गे मराठवाडा, तेलंगाणात कमी दाबाची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. केरळ किनारपट्टीवर तीन ते सहा किलोमीटर उंचीवर तसेच वायव्य राजस्थानात दीड किमी वर चक्राकार वारे वाहत आहेत. राजस्थान, छत्तीसगड येथे कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, वातावरणातही दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. वातावरणातील या बदलामुळे विदर्भातील शनिवारी काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हीच परिस्थिती पुढील चार दिवस राहणार असल्याने विदर्भातील काही ठिकाणी तुरळक व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.हेही वाचा - '...आत्महत्या करण्याची वेळ आलीय आमच्यावर'