अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामध्ये 15 मेपर्यंत वाढ देखील केली आहे. मात्र, बाजारपेठेतील गर्दी पाहता अमरावतीमध्ये लॉकडाऊन संपला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अमरावतीच्या रस्त्यांवर लोकांची गर्दी उसळली आहे. त्यामुळे अमरावतीकरांना कोरोनाची भीती नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता -
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, अमरावतीतील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसते. ईतवारा चौकात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली भाजीपाला व फळे खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. नागरिक, भाजीपाला व्यावसायिक आणि फळ विक्रेते कोरोनाच्या नियमांचे देखील पालन करत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात अमरावतीमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
11 वाजेपर्यंत परवानगी तरी दुकाने सुरूच -
राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेतील दुकानांना 11 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. असे असले तरी शहरातील अनेक भागात दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.