अमरावती : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या जिल्ह्यातील मेळघाटात अतिदुर्गम गावातील आदिवासी कुटुंबांना उन्हाळ्यात पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते. अनेक गावातील लोकांना चक्क पाच ते सहा किलोमीटर लांब अंतरावरून डोंगर चढत आणि उतरून पाणी आणावे लागते. हवामान खात्याने यावर्षी उन्हाचा पारा गतवर्षीपेक्षा वाढणार असल्याचा इशारा दिला असून मेळघाटात मार्च महिन्यातच अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चिखलदरा तालुक्यातील आकी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. येत्या आठ-दहा दिवसात चिखलदरा आणि धारणी या दोन्ही तालुक्यात अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता असून सर्वाधिक फटका हा चिखलदरा तालुक्यातील गावांनाच बसणार आहे.
अशी आहे प्रशासनाची तयारी : मेळघाटसह अमरावती जिल्ह्यातील सर्वच भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार यावर्षी 12 कोटी 43 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील 618 गावात विविध प्रकारच्या 800 उपाययोजनांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांमधील 618 गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 207 नव्या विहिरी प्रस्तावित असून ज्या भागात पाणीटंचाई आहे त्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी 429 विहिरी अधिग्रहित केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे काही गावांमध्ये नळ योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे.
12 कोटी 43 लाख रुपये केला जाणार खर्च : जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 668 गावात विविध प्रकारच्या 800 उपाययोजनांवर एकूण 12 कोटी 43 लाख 82 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या कृती आराखड्यानुसार नवीन विहिरींसाठी 207 गावांमध्ये 3 कोटी 14 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. 135 गावातील नळदुरुस्तीवर पाच लाख छत्तीस हजार, दहा गावांमध्ये तात्पुरत्या उपाय योजनेवर 34 हजार, 19 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 69 हजार आणि 429 गावांमध्ये विहीर अधिग्रहणासाठी तीन लाख 63 हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.
आकी गावात टँकरने पाणीपुरवठा : उन्हाळ्यामध्ये भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. मेळघाटातील एकूण 19 ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव असून सध्या घडीला मेघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या आकी या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे अशी माहिती जिल्हा जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
असा आहेत विहिरींचा प्रस्ताव
- तालुका विहिरींची संख्या
- अमरावती 25
- नांदगाव खंडेश्वर 16
- चांदुर रेल्वे 10
- धामणगाव रेल्वे 23
- अचलपूर 18
- अंजनगाव सुर्जी 04
- धारणी 17
- भातकुली 07
- तिवसा 20
- मोर्शी 09
- चिखलदरा 27
हेही वाचा : Heavy Rain Warning : राज्यात पुढील 4 दिवसात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा