अमरावती : 30-40 वर्षांपूर्वी पावसाळा सुरू झाला की गोगल गाय, देवगाय अशा विविध नावाने संबोधित केला जाणारा मऊ, मुलायम आणि दिसायला अतिशय सुंदर असा लाल रंगाचा मखमली किडा जिकडे-तिकडे दिसायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा किडा दुर्मिळ झाला आहे. तो आता पावसाळ्यात एखाद्या शेतशिवारात किंवा जंगलात क्वचितच दृष्टिक्षेपास पडतो. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अतिशय सुंदर अशा या मखमली किड्याचे जंगल संवर्धनात अतिशय महत्त्वाचे योगदान आहे.
विविध नावांनी ओळखला जातो : लाल भडक रंगाचा अतिशय नाजूक आणि जणू मखमल पांघरून असावा असा भास होणाऱ्या या किड्याला छोटेसे आठ पाय असतात. गोगलगाय, देवगाय अशी ह्या किड्याची ओळख असून संस्कृत भाषेमध्ये या किड्याला 'बीरबाहुती 'असे म्हटले जाते. उर्दूमध्ये हा किडा 'राणी किडा' या नावाने ओळखला जातो. तसेच मृग नक्षत्रात हा किडा आढळत असल्याने त्याला 'मृगाचा किडा' देखील म्हटले जाते.
वृक्षसंवर्धनात किड्याचे अनन्यसाधारण महत्व : हे मखमली किडे गोचीडासारखी माशा, नाकतोडे आणि इतर कीटकांना चिकटतात आणि आपले पोषण करतात. पूर्ण वाढ झालेले किडे पालापाचोळ्यावर वाढणाऱ्या बुरशी भक्षकांची अंडी खातात आणि अप्रत्यक्षपणे पालापाचोळा कुजविण्याच्या क्रियेला मदत करतात. पालापाचोळ्यावर वाढणाऱ्या बुरशीच्या भक्षकांची अंडी हा किडा खात असल्यामुळे बुरशी भक्षकांची संख्या कमी होण्यास मदत होते, आणि त्यामुळे बुरशी टिकून राहते. या किड्यामुळे झाडावरून खाली कोसळलेली पाने कुजण्यास मदत होते आणि यामुळे माती तयार होते. या मातीत झाडांच्या बिया रुजतात, ज्यातून नवे वृक्ष जन्माला येतात. अशाप्रकारे वृक्षसंवर्धनात या किड्याचे महत्व अनन्यसाधारण असे आहे.
प्रदूषणामुळे कीटकांचा ऱ्हास झाला : पावसाळा सुरू झाला की कीटक कोषातून बाहेर येतात. कीटकांचे निसर्गासोबत एक नाते आहे. वेणीच्या काळात पक्ष्यांना भरपूर खाद्य लागतं. निसर्गाने कीटकांच्या माध्यमातून ही व्यवस्था केली आहे. मात्र अलीकडच्या काळात रासायनिक खतं तसेच प्रदूषणामुळे अनेक कीटकांचा ऱ्हास झाला. यामुळेच मखमली किडा देखील आता पूर्वीप्रमाणे आढळत नाही, अशी खंत वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली. शाश्वत विकासाच्या दृष्टीने हे मखमली किडे जगले पाहिजे, असे यादव तरटे म्हणाले.
मानवच किड्यांचे शत्रू : पावसाळ्यात एकदाच दर्शन देऊन सुप्तावस्थेत जाणाऱ्या या राजबिंड्या किड्यांचे नाहीसे होणे आपल्या खिजगणतीतही नसते. या किड्याला निसर्गतः जास्त शत्रू नसले तरी दुर्दैवाने आता मानव हा त्याचा मुख्य शत्रू बनला आहे. वंशपरंपरेने आदिवासींना ज्ञात असलेले या किड्यांचे औषधी गुणधर्म आता बहुराष्ट्रीय कंपन्यांना माहीत झाले आहेत. त्यामुळे हे किडे गोळा करणे, हे अनेकांचे अर्थार्जनाचे साधन बनले आहे. अतिसार या आजारावर या किड्यांचा उपयोग होतो. तसेच या किड्यांचे तेल अर्धांगवायुवर रामबाण औषध आहे. त्यामुळे आता बहुराष्ट्रीय कंपन्या या किड्यांना नष्ट करत आहेत. हे असे निसर्गचक्रातील ढवळाढवळीचे परिणाम अतिशय भयंकर असतील, अशी भीती वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा :