अमरावती - अमित उपाध्याय या व्यक्तिचे येथील विवाहित महिलेशी एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती महिला ही एक वर्षांपासून अमितसोबतचं राहत होती. या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी पिता-पुत्रांनी संगणमताने अमित याचा खून केल्याची माहिती चांदूररेल्वे पोलिसांनी दिली आहे. एक अनोळखी इसम रक्ताच्या थारोळयामध्ये मरुन पडला असल्याची माहिती राजना येथील पोलीस पाटलाने चांदूररेल्वे पोलिसांना दिली. दरम्यान, या घटनेची चौकशी केली असता त्या व्यक्तिची अमित नारायण उपाध्याय अशी ओळख समोर आली आहे. तर, दुसरीकडे अमितच्या आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगड आणि काठी मारून केली हत्त्या - पोलीसांच्या माहितीनुसार, अमित हा (दि. २० डिसेंबर)रोजी रात्री एकच्या सुमारास आरोपींच्या घरी राजणा येथे गेला. त्यावेळी त्यांचा वाद विवाद झाला. तो वाद विकोपाला जावून त्या महिलेच्या पतीने आणि मुलाने दगडासह बांबूच्या काठ्यांनी मारहाण करत त्याचा जागीच खून केला. खून केल्यानंतर सर्व आरोपी हे पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना राजना येथून अटक करण्यात आली. एसपी अविनाश बारगळ, एसडीपीओ जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात चांदुर रेल्वेचे ठाणेदार सुनिल किनगे, सहायक पोलीस निरिक्षक अनिल पवार व मनोज सुरवाडे, अंमलदार संतोष मोरे, अरविंद गिरी, रवि भुताडे, योगेश नेवारे, चांदु गाडे यांनी ही कारवाई केली आहे.
एक वर्षांपासून होते प्रेमसंबंध - अमित उपाध्याय व प्रौढ आरोपीची पत्नी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. ती महिला एक वर्षांपासून अमितसोबत राहत असल्याने आरोपींनी त्याचा राग मनात धरुन संगणमताने अमितचा खून केला. तीनही आरोपींना अटक केली अशी माहिती चांदूर रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांनी दिली आहे.