अमरावती - जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीत सुरू केलेल्या क्वारंटाईन सेंटरच्या मागे शेकडो दारूच्या रिकाम्या बाटल्याचा खच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या मालेगाव आणि अन्य ठिकाणी बंदोबस्तासाठी गेलेले राज्य राखीव दलाचे जवान परत आल्यानंतर त्यांना या क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. हेच जवानच दारू पिऊन रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फेकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे मोझरी विकास आराखडा अंतर्गत भव्य दिव्य प्रबोधणी बांधण्यात आली आहे. याठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास बांधण्यात आले आहे. मात्र, हे भक्त निवास सध्या बंद आहे. याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या तिथे शेकडो जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये राज्य राखीव दलातील पोलिसांचा देखील समावेश असल्याचे बोलल्या जात आहे.
![hundred of alocohol bottles found in back side of quarantine centre in mojhari amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7624217_amravati.jpg)
सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू पिणे, मटण खाणे, असे प्रकार सुरू असल्याचे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. दास टेकडीजवळ असलेल्या या क्वारंटाईन सेंटरचा मागील रस्ता हा शेतात जातो. तर वरचा रस्ता हा मंजुळा माता नगर परिसरात जातो. त्याच मुख्य रस्त्यावर दारूच्या बाटलांचा खच पडलेला दिसत आहे. या पोलिसांना बाहेरील लोक मटण, चिकन आणि दारूचा पुरवठा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.