अमरावती - येत्या २० आणि २१ मार्चला संपूर्ण देशात होळी आणि धूलीवंदनाचा सण साजरा होणार आहे. आतापासूनच गावोगावी याची तयारी करण्यात येत आहे. मात्र, दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदमध्ये तब्बल ६८ वर्षांपासून गावात होळी आणि धूलिवंदन साजरी होत नाही. उलट, या दिवशी गावकरी धार्मिक कार्यक्रम आयोजित करून येथील श्रद्धास्थान असलेल्या परमहंस परशराम महाराजांना आदरांजली अर्पण करतात.
पिंपळोद या गावात ६८ वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या प.पु.परमहंस परशराम महाराजांचे निधन होळीच्या दिवशी झाले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत गावात होळी आणि रंगपंचमी साजरी होत नाही. सन १९०० मध्ये चांदुर बाजार तालुक्यातील जैतापुरमध्ये परशराम महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बळीराम तर आईचे नाव भीमाबाई होते. बाल्यावस्थेत ते पिपंळोद येथे आले, आणि इथेच त्यांनी कायमस्वरूपी वास्तव्य केले. १९५१ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्यामुळे गावातील लोकांसह परिसरातील नागरिकांचे ते श्रद्धास्थान झाले.
'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पिंपळोदमध्ये संत परमहंस परशराम महाराजांचे सुंदर मंदिर असून यामध्ये गौतम बुद्ध यांच्यासह विविध देवतांच्या सुबक मूर्ती आहेत. या ठिकाणी गावातील सर्वधर्मीय गावकरी एकत्र येवून दरवर्षी यात्रा महोत्सव साजरा करतात. होळीच्या दिवशी या गावातून पालखी काढण्यात येते. या वेळी संपूर्ण गाव एकत्र येऊन महाराजांना आदरांजली वाहतात.
संपूर्ण राज्यात होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण होते. मात्र, होळी आणि रंगपंचमी साजरी न करणारे पिपंळोद हे कदाचित राज्यातील एकमेव गाव असावे.
: