अमरावती - अंबादेवी मंदिरासमोर सायंकाळी विधिवत होळीचे दहन करण्यात आले. अंबादेवी मंदिरासमोर शेकडो वर्षापासून होळी पेटवण्याची परंपरा आहे. या होळीत नारळ अर्पण करून आपली मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा असून शेकडो भाविकांनी या होळीत नारळ अर्पण केले. अतिशय उत्साहात आणि धार्मिक विधी सह श्री अंबादेवी मंदिरासमोर होळीचा सण साजरा करण्यात आला.
हेही वाचा - शेतीच्या वाटणीवरून वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
होळीच्या पंधरा दिवसांपूर्वी हेट्याचे झाड आणून ते मंदिरासमोर खड्ड्यात लावले जाते. या झाडाच्या फांद्यांना लाल लाल कपड्यांमध्ये गुंडाळून नारळ बांधण्याची परंपरा आहे. आपल्या मनातील इच्छा होळीला नारळ वाहिल्याने पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आज(सोमवारी) सायंकाळी मंदिराचे विश्वस्त विलास मराठे यांनी पत्नीसह होळीची विधीवत पूजा केली. पूजा आटोपल्यावर कापूर पेटवून होळीचे दहन करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी होळीमध्ये नारळ टाकण्यासाठी गर्दी केली होती. श्री अंबा देवी आणि एकविरा देवी यांचा जयजयकार यावेळी करण्यात आला.