अमरावती - शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मंगळवारी रात्रीपासून पाऊस कोसळला. बुधवारी पहाटेही मूसळधार पाऊस झाला. सकाळी 7 वाजेपर्यंत 45 मीमी पावसाची नोंद झाली. 15 दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे भातकुली आणि दर्यापूर तालुक्यातील काही गावे पाण्यात बुडाली असली तरी जिल्ह्यातील काही भागात अद्यापही अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसलेला नाही.
बुधवारी पहाटे मुसळधार पाऊस बरसला. अमरावती शहरासह नांदगाव खंडेश्वर, चांदुर, रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड या भागात दमदार पाऊस कोसळला. जुलै महिना अर्धा सरत आला असतानाही जिल्ह्यात कुठेही पावसाची झड लागली नाही. आतापर्यंत तुटक स्वरूपातच पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक दिवस दमदार पाऊस कोसळला त्यानंतर 15 जूनला पाऊस बरसला. तेव्हापासून अमरावतीत मुसळधार पाऊस झाला नाही.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला दर्यापूर आणि भातकुली तालुक्यातील काही भागात गावे चक्क पाण्यात बुडाली. त्यानंतर जिल्ह्यात कुठेही पाऊस बरसला नाही. मंगळवारी दुपारी काळे ढग दाटून येताच मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज होता. मात्र, केवळ रिमझिम पाऊस बरसला. रात्रभर पावसाची रिमझिम सुरू असताना पहाटे 4 नंतर पावसाने वेग धरला आणि सकाळी 7 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला.