अमरावती - धारणी तालुक्यातील भूलोरी गावात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागून ७० आदिवासी बांधवांची घरे जळून खाक झाली आहेत. अर्धे गाव या आगीच्या कचाट्यात सापडलं असून यात लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीत गावातील ४ बैलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर ३ तीन सिलिंडरचा स्फोट झाला झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आहे.
धारणी येथे अग्निशमन दलाचे बंब नसल्याने आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. तसेच गावात दुष्काळमुळे पाणी नसल्याने बाहेरून पाणी आणून गावकरी आग विझवत आहेत. सध्या मध्यप्रदेशमधील बरहानपूर जिल्ह्यातील शहापूर नगरपरिषदची अग्निशमन दल या गावाकडे रवाना झाले आहे.
आज दुपारी २ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे गावकरी सांगत आहेत. आग विझविण्यासाठी कोणतीही मदत यंत्रणा भुलोरी या गावात पोहचली नाही. आगीने भयंकर उग्र रूप धारण केले असल्याने नागरिकांनी आपला जीव धोक्यात टाकून आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतू अद्यापही आग सुरूच आहे.
घटनेची माहिती मिळताच धारणी तहसीलची एक टीम भूलोरी गावात पोहचली होती. धारणी येथून पाण्याचे टँकर रवाना झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धारणी नगर परिषदला अग्निशमन गाडी द्यावी, ही मागणी नागरिक करीत आहे