अमरावती - सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी सखी मतदान केंद्रावर तयारी सुरू असतानाच केंद्रप्रमुखाला त्यांच्या आईच्या निधनाची बातमी मिळाली. अमरावती विधानसभा मतदारसंघात गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल हे सखी मतदान केंद्र आहे. येथील केंद्रप्रमुखांच्या आईच्या निधनाची बातमी मिळताच मतदान केंद्रावर शोककळा पसरली.
केसरबाई लाहोटी महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या माया वाटाणे असे गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी असणाऱ्या सखी मतदान केंद्राच्या प्रमुखांचे नाव आहे. त्यांच्या आईची प्रकृती काही दिवसांपासून ढासळली असल्याने त्यांनी निवडणुकीच्या कामात मला सहभागी करू नका, असा अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावून त्यांना अमरावती शहरातील गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल या सखी मतदान केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.
हेही वाचा - धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल; सुमोटो दाखल
शनिवारी दुपारी मतदान केंद्रावरील सर्व सखींसह प्रा. माया वाटाणे गव्हर्मेंट गर्ल्स स्कूल येथे पोहोचल्या. रविवारी होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्रावर तयारी सुरू असतानाच सायंकाळी सहा वाजता प्राध्यापक माया वाटणे यांच्या आई कल्पना वाटाणे यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून कळवताच त्यांना अश्रू अनावर झाले. मतदान केंद्रावर सोबत असणाऱ्या सखींनी त्यांची समजूत काढली. याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यावर त्यांच्या जागी दुसऱ्या केंद्र प्रमुखाची नियुक्ती करून त्यांना सुटी देण्यात आली.
हेही वाचा - जालना : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवाजी सवने यांच्यावर हल्ला