अमरावती - जिल्ह्यात मेळघाटात सिपना नदीला आलेल्या पुराचा हरिसाल गावाचा जबर फटका बसला आहे. या पुरात अनेकांचे घर उद्धवस्त झाले असून पूर पीडितांनी मंदिर आणि बाजार ओट्यांवर आश्रय घेतला आहे. नदीचे पाणी हरिसाल येथील पुलावरून वाहून गेल्याने अमरावती-धारणी मार्ग पहाटे 3 वाजेपासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत बंद होता.
मेळघाटात रविवारी सकाळी तसेच रात्री देखील मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे सिपना नदीला पूर आला. नदीचे पाणी चक्क अमरावती-धारणी मार्गावरील पुलावरून वाहत असल्याने हरिसाल गावचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे नदीकाठी राहणाऱ्यांची तारांबळ उडाली. नदीकाठी असणारे 2 घरे वाहून गेले आहेत, तर 20 ते 25 गावात घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
दरम्यान पुरामुळे घरात अडकून बसलेल्या वृद्ध महिलेला वाचवण्यासाठी धावलेल्या तरुणावर घर कोसळले. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचला. मेळघाटात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.