अमरावती: अमरावतीच्या बडनेरा मार्गावर गोपाल नगर परिसरात खुल्या मैदानात हनुमान चालीसा पठाणासाठी भव्य सभा मंडप टाकण्यात आले होते. या ठिकाणी सभा मंचावर हनुमानाची सुंदर अशी मूर्ती मध्यभागी ठेवण्यात आली. तसेच सभा मंचावर मागच्या बाजूला प्रभू श्री राम सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेतली. हनुमान चालीसा पटनासाठी येणाऱ्या भाविकांची नोंदणी केली होती. नोंदणी करणाऱ्या भाविकांना भगवी टोपी तसेच हनुमान चालीसा आणि एक चांदीचा शिक्का भेट देण्यात आला. चप्पल ठेवण्यासाठी देखील बाहेरच खास व्यवस्था करण्यात आली होती.
उद्धव ठाकरेंवर केली टीका: हनुमान चालीसा पठणासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालीसा कार्यक्रम स्थळावर पोहोचल्यावर, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात दुर्दैवी मुख्यमंत्री असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न असो तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही. आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी हिंदुत्व विरोधात भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करावे इतकी विनंती आम्ही त्यांना केली होती. मात्र त्यांनी अद्याप पर्यंत हनुमान चालीसा पठण केले नाही. यामुळेच त्यांच्या हातून शिवसेना हा पक्ष निघून गेला. त्यांची स्वतःची प्रतिमा देखील प्रचंड खालावली असल्याची टीका देखील खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.
111 फूट हनुमान मूर्ती उभारण्याचा संकल्प: खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील छत्रीतला परिसरात 111 फुटाची हनुमान मूर्ती उभारण्याचा संकल्प केला आहे. वर्षभरात छत्री तलाव परिसरात ही मूर्ती साकारली जाईल असे देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांचा आज वाढदिवस देखील आहे. हनुमान चालीसा पठणानंतर त्या यात सभामंडपात वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील स्वीकारणार असल्याची घोषणा हनुमान चालीसा पठणस्थळी वारंवार केली जात आहे.