अमरावती- अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आज हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हजारो अमरावतीकरांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित धावपटू रोनाल्डो किबीओट हे या स्पर्धेचे खास आकर्षन ठरले. त्यांनी हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन २१.१ किलोमीटरचे अंतर अवघ्या एका तास सात मिनिटात पार करून विक्रम नोंदविला.
जिल्हा क्रीडा संकुल येथून आज सकाळी सहा वाजता २१ किलोमीटर अंतराच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर १० किलोमीटर पावर रन आणि पाच किलोमीटर अंतरापर्यंत चिल्ड्रन्स ड्रीम रन, तसेच महिलांकरिता विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली. हाफ मॅरेथॉन व पावर रनमध्ये धावपटूंची अचूक वेळ नोंदवता यावी याकरिता प्रत्येक धावपटूला २१ किलोमीटर अंतरात चार वेळा इलेक्ट्रॉनिक सेंसर पॉईंट पार करावा लागला. केनिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धक रोनाल्ड किबीओट यांनी पुरुष गटात बाजी मारली तर सेली जिबियो या महिला गटात विजयी ठरल्या.
दरम्यान स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांकरिता चार ठिकाणी एनर्जी स्टेशन ठेवण्यात आले होते. स्पर्धकांना त्या ठिकाणी पाणी, केळी पुरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमरावती मॅरेथॉन असोसिएशनचे पदाधिकारी दिलीप पाटील, प्राध्यापक सुभाष गावंडे, प्राध्यापक अतुल पाटील, किशोर वाठ, गजानन धर्माळे, मुकुंद वानखडे, सतीश दवंडे, वासुदेव रोंगे, राजेंद्र पाटील, नाना उदापूरे, नरेंद्र दापूरकर, पंकज उभाड यांनी प्रयत्न केले. हाफ मॅरेथॉन स्पर्धेमुळे अमरावती शहराचे वातावरण आज सकाळी उत्साही झाले होते. रोनाल्ड किबीओट यांना भारतातील मॅरेथॉनचा सात वर्षांचा अनुभव आहे. खास करून त्यांना महाराष्ट्रात चांगला अनुभव आला असून यापूर्वी साताऱ्यातील मॅरेथॉनमध्ये देखील ते धावले असून आज अमरावतीतही खूप छान अनुभव मिळाल्याचे रोनाल्डो यांनी सांगितले.
हेही वाचा - 'काँग्रेस अध्यक्षांनी कधीचेच मैदान सोडले, तर राष्ट्रवादी खाली होण्याच्या मार्गावर'