अमरावती - आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची घोषणा केल्यामुळेच भाजप आणि शिवसेनेची युती झाली. अमरावतीच्या विद्यमान खासदार आनंदराव आडसूळ यांनी दहा वर्षांत जिल्ह्याचे वाटोळे केले आहे. सातारा जिल्ह्यातील हे पार्सल मी यावेळी साताऱ्याला पाठवणार आहे, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी व्यक्त केला. गुणवंत देवपारे हे अमरावती लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत.
२०१४ ची निवडणूक ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून लढले होते. गत निवडणुकीत त्यांनी ९० हजारापर्यंत मते मिळाली होती. यावेळी मोदी लाट नसल्याने आपला विजय निश्चित असल्याचे गुणवंत देवपारे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
सर्व सामान्य शेतकरी आणि वंचित घटकांचा विकास करणे हाच आमचा उद्देश आहे. यावेळी मोदी लाट ओसरली असून माझा विजय निश्चित आहे. विद्यमान खासदार हे जिल्ह्याबाहेरचे आहेत. त्यांनी जे काही पुरस्कार मिळविलेत ते विकत घेऊन मिळवले. जे पुरस्कार घेतलेत त्या तुलनेत जिल्ह्याचा विकास झाल्याचे कुठेही दिसत नाही. जिल्ह्यात शेतकरी संकटात आहे. युवकांच्या हाताला रोजगार नाही, अशी खंतही देवपारे यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची घोषणा करताच भाजप आणि शिवसेनेप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही हादरले. अमरावतीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनी एखाद्या संघटनेला पाठिंबा देणे, ही दुर्दैवी बाब असल्याचेही ते म्हणाले.