अमरावती Nandurbar Woman Missing : सहा वर्षापूर्वी नंदुबारवरुन गुजरातला एका महाराजांच्या यात्रेला गेलेली 35 वर्षीय महिला गावाकडं परत जाताना भरकटली होती. चार पाच दिवसांच्या भटकंतीनंतर ती महिला विमनस्क अवस्थेत अमरावती रेल्वे स्टेशनला पोहोचली. पोलिसांना गस्तीदरम्यान ही महिला स्टेशनवर आढळली. गुजरातहून हरविलेल्या त्या महिलेला सहा वर्षांनंतर कुटुंब मिळालं आहे. त्यावेळी आठ वर्षांची तिची लेक चक्क 13 वर्षांची झाली. सहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या कुटुंबातील महिलेला बघताच कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं तसेच डोळ्यातून आनंदाश्रू निघाले.
नंदुरबारवरुन गुजरातला गेली होती महिला : नंदुरबारवरुन गुजरातला एका महाराजांच्या कार्यकर्माला ही महिला गेली होती. मात्र त्यानंतर परत येताना ही महिला रस्ता भरकटली आणि थेट अमरावतीला जाऊन पोहोचली. अमरावती पोलिसांना ती महिला रेल्वे स्थानकावर आढळून आल्यानंतर पोलिसांनी या महिलेला सामाजिक संस्थेत दाखल केलं.
इशदया संस्थेत करण्यात आले मानसिक उपचार : मार्च 2018 मध्ये इशदया मदर टेरेसा होम संस्थेमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला ही महिला कोणाशीच काही बोलत नव्हती. नाव, गाव पण तिनं सांगितलं नव्हतं. संस्थेमध्ये तिच्यावर शारीरिक आणि मानसिक उपचार करण्यात आल्यानंतर ती बरी झाली. तिचं नाव कोणालाच माहीत नसल्यामुळं 'आशा' असं तिचं नामकरण करण्यात आलं. संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ स्मिता साठे यांनी या महिलेशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काहीही प्रतिसाद न देणारी आशा काही दिवसानंतर आशा मात्र हळूहळू बोलायला लागली होती. संवादादरम्यान आशा एका मुलीची आई, आहे असं लक्षात आलं. मुलीला भेटण्याची त्याची तीव्र इच्छा तिच्या बोलण्यातून जाणवायला लागली होती. परंतु तिच्या कुटुंबीयांचा शोध घेणं हे एक मोठं आव्हान डॉ स्मिता साठे यांच्यापुढं होतं. काही दिवसानंतर आशानं आपण नंदुरबार जिल्ह्यातील वाघाळे गावातील असल्याचं डॉ स्मिता साठे यांच्याकडं सांगितलं.
पोलिसांनी साधला नंदुरबार पोलिसांशी संपर्क : आशानं सांगितलेल्या गावापर्यंत कसं पोहचावं हे मोठं आव्हान संस्थेपुढं होतं. आता काही झाली तरी चालेल, परंतु आपण आशाच्या कुटुंबाला शोधून तिला त्यांच्या स्वाधिन करायचं, असा दृढ निश्चय डॉ स्मिता साठे यांनी केला. त्यांनी त्वरित अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्याशी संपर्क साधला. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रिता उईके यांनी क्षणाचाही विलंब न लावता नंदुरबार इथल्या पोलिसांशी संपर्क साधून सदर महिलेचं नाव, गाव आणि फोटो पाठवून संबधित गावातील पोलीस पाटलांशी संपर्क साधला. दोन दिवसापूर्वी आशाचे वडील, भाऊ आणि 13 वर्षीय मुलगी असे सगळे नंदुरबारहून इशदया संस्थेमध्ये आलेत. तिला सन्मानानं घरी घेऊन गेले. संस्थेनंदेखील माहेरवाशिणीप्रमाणं आशाची रवानगी केली. सिस्टर जोसिका, सिस्टर रोसिन, डॉ स्मिता साठे आणि पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या प्रयत्नांमुळं एका मुलीला तिची आई, भावाला बहीण अन् वडिलांना मुलगी मिळाली.
तब्बल सहा वर्षानंतर कुटुंबाला मिळाली आशा : तब्बल साडेआठ वर्षानंतर आपल्या कुटुंबात परतण्याचं भाग्य मिळालं आहे. याचा आनंद आशाच्या चेहऱ्यावर झळकत होता. तर आई मिळाली म्हणून मुलीला गगन ठेंगणं झालं होतं. बहीण पुन्हा मिळाली म्हणून भावाचा चेहराही खूप काही सांगून गेला. बेवारस म्हणून सांभाळ आणि उपचार करून आशाला पुन्हा तिच्या कुटुंबियांचं प्रेम मिळवून देण्याचं काम इशदया या संस्थेनं केलं. गुजरातहून हरवलेल्या आशाला सहा वर्षांनंतर कुटुंब मिळालं. त्यावेळी आठ वर्षांची तिची लेक 13 वर्षांची झाली होती. सहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या कुटुंबातील महिलेला बघताच कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं तसंच डोळ्यातून आनंद अश्रू निघाले. डॉ. स्मिता साठे आणि पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या प्रयत्नांना आलेल्या यशामुळे एक वाताहात झालेलं कुटुंब सुरळीत झालं आणि एका मुलीला तिची आई मिळाली. इशदया सारख्या संस्था आणि पोलीस विभाग खंबीरपणानं कार्यरत आहेत. त्यामुळं आमची मुलगी आम्हाला इतक्या वर्षांनंतर सुस्थितीत परत मिळाली, अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केली.
हेही वाचा :