अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर-भातुकली मार्गाच्या बांधकामावेळी रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या नाल्यामुळे निंभा गावातील प्रविण लकडे या शेतकऱ्याची शेती पाण्याखाली गेली आहे. रस्त्याच्या बांधकामावेळी कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने नाली बांधल्याने लकडे यांच्या नऊ एकर शेतीतील सोयाबीन, कापूस, तूर, उळीद पिकांना जलसमाधी मिळाली आहे. यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतात सध्या भरपूर पाणी असल्याने दुबार पेरणीसाठीही वाफश्याची वाट बघावी लागणार आहे.
काल दुपारी दर्यापूर-भातकुली परिसरात मुसळधार पाऊस झाला. यापावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. काही दिवसांपूर्वाच दर्यापूर- भातकुली रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी रस्त्यावरील पाणी बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाल्या चुकीच्या पद्धतीने बांधल्याने सर्व पाणी प्रविण लकडे या शेतकऱ्याच्या शेतात घुसले आहे. यामुळे लकडे यांच्या शेतातील नुकतेच उगवलेली विविध पीके पूर्णतः उध्वस्त झाले आहेत. शासनाने नुकसान झालेल्या शेतीचा तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होत असून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला असून जल स्रोतांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.