अमरावती : हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी अमरावती शहरात काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. विज ढोल पथक 50 झाख्या आणि तरुणांचा प्रचंड उत्साह हे या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य होते.
परप्रांतातील साधू आणि देखावे: काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत उत्तर प्रदेशातून सुमारे 40 साधूंना या मिरवणुकीसाठी अमरावतीत आणण्यात आले. यासह हनुमानाच्या रूपात सर्वांना आकर्षित करणारा बहुरूपी हा खास केरळ मधून या मिरवणुकीत सहभागी झाला. अमरावती शहरासह अकोला वर्धा नागपूर जिल्ह्यातील ढोल पतके या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आंबा गेटच्या हा जुन्या शहरातील आझाद हिंद मंडळाच्या प्रांगणातून ही भव्य शोभायात्रा निघाली. शोभा यात्रेचे शेवटचे टोक हे आंबा गेटच्या आत असताना दुसरे टोक थेट राजकमल चौक पार करून शहर कोतवाली पोलीस ठाण्यापर्यंत होते.
काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग: अमरावतीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या ह्या मिरवणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच अमरावती शहरातील शेकडो युवक सहभागी झाले होते. जगद्गुरु राज राजेश्वर माऊली हे देखील या मिरवणुकीत प्रामुख्याने सहभागी झाले होते. जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधी दिगंबर लिंगाडे, अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेना नेते अनंत गुढे, माजी महापौर मिलिंद चिमटे, विलास इंगोले शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत संजय शिरभाते, निलेश गुहे समीर जवंजाळ, सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. राजकमल चौक येथे हनुमानाची आरती करण्यात आली तसेच हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले.
वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ: हनुमान जयंतीनिमित्त काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य मिरवणुकी दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कुठलेही नियोजन आखण्यात आले नसल्यामुळे ही भव्य मिरवणूक राजकमल चौकात पोहोचल्यावर वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला पाहायला मिळाला. राजकमल चौकात अगदी लहान सहान कार्यक्रम असताना रेल्वे स्थानकावरून राजकमलच्या दिशेने येणाऱ्या उड्डाण पुलावरील वाहतूक ज्येष्ठ चौकाच्या दिशेने वळवली जाते. मात्र हनुमान जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक राजकमल चौकात पोहोचली असताना उड्डाण पुलावरून येणारी वाहने तसेच जयस्तंभ चौकाच्या दिशेने आणि राजापेठ कडून येणाऱ्या वाहनांना मधात कुठेही रोखण्यात आले नाही तसेच किंवा इतर मार्गाने वळविण्यात आले नाही यामुळे राजकमल चौकात मिरवणुकीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
हेही वाचा: वर्षात दोन वेळेस साजरी होते हनुमान जयंती, वाचा कारण