अमरावती: अमरावती पदवीधर मतदार संघात डॉ रणजीत पाटील यांचा सलग दोन वेळा विजय झाला. आता यावेळी देखील रणजीत पाटील हेच निवडून येणार असा विश्वास भाजपचे विदर्भ महामंत्री जैन सुख संचेती यांनी नुकताच व्यक्त केला. स्वतः डॉ. पाटील यांनी देखील आपण पदवीधरांसाठी भरभरून काम केल्याचा पाढा सहा वर्षानंतर पहिल्यांदाच अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधताना वाचून दाखवला. एकूणच डॉ. पाटील यांचे पदविधरांच्या समस्या सोडविण्यास किती योगदान आहे यापेक्षा त्यांच्या विजयासाठी भाजपमधील लहानात लहान कार्यकर्ता देखील झपाटलेला असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित अशी आशा भाजपच्या सर्व स्थानिक नेत्यांत आहे.
अशी झाली 2017 ची निवडणूक : विशेष म्हणजे 2017 च्या निवडणुकीत त्यावेळी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे स्वतः डॉ. पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी देखील उपमुख्यमंत्री असणारे फडणवीस पाटलांच्या सोबत आहेत. सलग तीस वर्ष लुटा आणि प्राचार्य बीटी देशमुख यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अमरावती पदवीधर मतदार संघात भाजपने 2012 मध्ये डॉ पाटील यांना बी टी देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी दिली. पहिल्याच निवडणुकीत भाजपने नियोजित रणनीती आखून प्रचंड मतदार नोंदणी करून घेतली आणि प्राध्यापक बीपी देशमुख यांचा ऐतिहासिक पराभव केला. 2017 च्या निवडणुकीत प्राध्यापक बीपी देशमुख यांनी आता निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेतला होता.
डाॅ. पाटलांची बाजी : नोटाला नेहमीच काँग्रेसची साथ राहिली होती 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके हे निवडणूक रिंगणात उतरले होते. खोडके यांच्यासोबतच भाजपचे बंडखोर डॉक्टर अविनाश चौधरी यांच्यासह आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे प्राध्यापक डॉक्टर दीपक धोटे हे देखील निवडणूक रिंगणात होते. संजय खोडके आणि डॉ. पाटील यांच्यात लढत होणार असे स्पष्ट असताना डॉ. रणजीत पाटील हे 35 हजाराहून अधिक मतांनी खोडक्यांपेक्षा समोर निघाले. 2017 च्या निवडणुकीत 61 हजार 992 मतांचा कोटा निश्चित असताना डॉ. पाटील यांना 78,051 मते मिळाली तर संजय खोडके यांना केवळ 34,154 मतं मिळाली होती. डॉक्टर अविनाश चौधरी आणि बच्चू कडू यांचे उमेदवार प्राचार्य डॉक्टर दीपक धोटे हे दूरपर्यंत देखील कुठे शर्यतीत नव्हते.
बच्चू कडू - रवी राणांना हवी फक्त चर्चा : कुठलीही निवडणूक किंवा गाजणारा राजकीय विषयात आपल्या नावाची चर्चा व्हावी यासाठी नेहमीच नियोजन आखणारे आ. बच्चू कडू आणि आ. रवी राणा यांना या निवडणुकीत देखील स्वतःची चर्चा व्हावी इतकाच उद्देश दिसून येत आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर्स असोसिएशन अर्थात मेस्टाचे किरण चौधरी यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदे फडणवीस सरकारने आपल्या काही प्रस्तावांची दखल घेतली नसल्यामुळे या निवडणुकीत आपण उमेदवार दिल्याचे आ. कडू म्हणत असले तरी 2017 च्या निवडणुकीत देखील शहरातील नामांकित ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर दीपक धोटे हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार होते. 2017 च्या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या उमेदवाराला पदवीधर मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. आता पूर्णतः नवख्या असणाऱ्या किरण चौधरी यांना उमेदवारी देऊन बच्चू कडू यांना केवळ या निवडणुकीत चर्चेत राहायचे असल्याचेच स्पष्ट होते.
काँग्रेसचे अद्याप काही खरं नाही : अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजप संपूर्ण ताकदीने मैदानात उतरली असताना काँग्रेसच्या वतीने अद्याप उमेदवारास निश्चित झाला नसल्याने काँग्रेसचे या निवडणुकीत काही खरे नाही अशीच चर्चा रंगत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन दिवसांपासून उमेदवार शोधण्यासाठी अमरावतीत तळ ठोकून आहेत मात्र त्यांना अद्याप उमेदवार कोण हेच गवसले नाही. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या वतीने कोणी योग्य उमेदवार मिळेल का याचा शोध आज देखील घेतला जातो आहे.
एक लाख 85 हजार 952 मतदार : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात एकूण 1 लाख 85 हजार 925 मतदारांची नोंदणी झाली आहे .यामध्ये अमरावती जिल्ह्यात 33 हजार 236, अकोला जिल्ह्यात 27 हजार 943 बुलढाणा जिल्ह्यात 26 हजार 161 वाशिम जिल्ह्यात 11 हजार 078 आणि यवतमाळ जिल्ह्यात 22 हजार 526 मतदारांची नोंदणी झाली आहे. 2017 मध्ये मात्र मतदारांची संख्या ही दोन लाख दहा हजार इतकी होती. 2017 च्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात एकूण तीन उमेदवार होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी अभियान राबविले होते. 2022 च्या निवडणुकीत मात्र अमरावती जिल्ह्यातून एकही सगळ्या उमेदवाराने निवडणुकीची तयारी केली नसल्यामुळे अमरावती जिल्ह्यात मतदार नोंदणी देखील भाजपच्या व्यतिरिक्त इतर कोणी हवी तशी केली नाही.