अमरावती- 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' अशा घोषणा देऊन वास्तविक समस्यांकडून सामान्य लोकांचे लक्ष भरकटवून ते पाकिस्तानकडे वळविण्याचे काम भाजप सरकार करत आहे. आज अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, अशा वेळेस समाजाने भावनिक न होता वास्तवाचे भान राखावे, असे आवाहन काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष व आमदार यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निवडणूक प्रचार समितीच्यावतीने आज अमरावतीत 'महा पर्दाफाश' सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी अशी प्रतिक्रिया दिली. ठाकूर म्हणाल्या की, २०२२ पर्यन्त देश महासत्ता होणार, अशी भाषा केली जात आहे. मात्र, वास्तवात आज देशाची अर्थव्यवस्था कोसळत आहे.
नांदगाव पेठ एमआयडीसीमधील ऊर्जा प्रकल्पाला मी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज या भागात औद्योगिक विकास होत आहे. काँग्रेसने या भागात औद्योगिक विकासाला सुरुवात केली. मात्र, आता जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहेत. शेतकरी, सामान्य माणूस संकटात असताना सर्व महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याऐवजी भाजपकडून पाकिस्तानच्या नावाने भावनेशी खेळ केला जात आहे. भाजपच्या याच धोरणाचा पर्दाफाश आम्ही करणार आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी खासदार नाना पटोले, पक्षाचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष चारुलता टोकस, आमदार विरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आदी उपस्थित होते.